१९७७ मधील गाजलेल्या ‘शिर्डी के साई बाबा’ चित्रपटात साईबाबांची अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (वय ८६) गंभीर आजारपणानंतर आता हळूहळू बरे होत आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये ‘सेप्सिस’ या अत्यंत धोकादायक संसर्गामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या सांध्यांवर गंभीर परिणाम झाल्याने त्यांना काही काळ आयसीयूमध्येही ठेवावे लागले होते.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रुग्णालयातील उपचारांचा खर्च १९ लाख रुपयांच्या पार गेला होता आणि हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. या वाढत्या बिलामुळे दळवी कुटुंबीय मोठे आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, ही माहिती समोर येताच अनेक हात त्यांच्या मदतीसाठी पुढे आले.
साईबाबा संस्थान आणि कलाकारांचा मदतीसाठी पुढाकार
डिसेंबर २०२५ मध्ये बॉम्बे हायकोर्टाने श्री साईबाबा संस्थान ट्रस्टला सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी ११ लाख रुपयांची मदत देण्याची मंजुरी दिली. तसेच बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि अक्षय कुमार यांनीही पुढाकार घेत त्यांना मोठी आर्थिक मदत केली, अशी माहिती सुधीर दळवी यांच्या पत्नी सुहास दळवींनी दिली.
सुधीर दळवी यांच्यावर घरीच सुरूयेत उपचार
‘बॉलीस्पाइस’शी बोलताना सुहास दळवी म्हणाल्या, “ते आता घरी परतले असून वॉकरच्या आधाराने हळूहळू चालत आहेत. वयामुळे ते थोडे गोंधळलेले असतात, पण घरी आल्याने ते आणि मी दोघेही खूप खूश आहोत. रुग्णालयाचा खर्च तर मोठा होताच, शिवाय तिथले वातावरणही रुग्णासाठी भीतीदायक असते.”
चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि साईभक्तांचे आभार मानताना त्या म्हणाल्या, “आम्ही बिल भरू शकत नाही हे कळताच कार्तिक, रणबीर, अक्षय आणि इंडस्ट्रीतील अनेक मंडळी सर्वात आधी मदतीला धावून आली. माझे पती साईबाबांच्या भूमिकेसाठी ओळखले जात असल्याने अनेक साईभक्तांनीही सढळ हाताने मदत केली. या कठीण काळात लोकांनी दाखवलेली ही आपुलकी आणि प्रेम पाहून खरोखरच मन भरून आले.”
“आता पैशांची नव्हे, फक्त प्रार्थनांची गरज”
त्या पुढे म्हणाल्या, “दर महिन्याला प्रेमाने पैसे पाठवणाऱ्या फिल्म असोसिएशनला आम्ही विनंती करतो की, त्यांनी ते पैसे आता दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीसाठी वापरावेत. माझ्या पतीला जितकी वैद्यकीय मदत हवी होती, तितकी मिळाली आहे. आता त्यांना फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. मी स्वतः वृद्ध आहे, तरीही मी आम्हा दोघांची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.”
