सनी देओलने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या करिअरमध्ये त्याचे काही जणांशई वादही झाले. त्यातलं एक नाव म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन. अंदाज, बरसात, अजयसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांचे अक्षय कुमार, सनी देओल यांच्यासह काही स्टार्सशी मतभेद झाले. सुनील यांनी सनी देओलला ‘आयुष्यातील सर्वात काळा अध्याय’ असं म्हटलं.
सुनील दर्शन यांनी विकी लालवानीला अलीकडेच एक मुलाखत दिली. सनी देओलबरोबर काम करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाबरोबर काम करण्यासारखं आहे, असं वक्तव्य सुनील दर्शन यांनी मुलाखतीत केलं. सनी ‘जानवर’ चित्रपटात काम करणार होता, पण सुनील यांच्याबरोबरच्या वादानंतर तो सिनेमा अक्षय कुमारने केला. अक्षय व सुनील यांनी सात चित्रपट एकत्र केले, पण नंतर मात्र त्यांच्यातही मतभेद झाले आणि दोघांनी परत कधीच एकत्र काम केलं नाही.
देव सगळं बघतोय – सुनील दर्शन
अक्षय कुमारचं कौतुक करत सुनील दर्शन सनी देओलबद्दल म्हणाले, “अक्षय कुमार अजिबात वाईट माणूस नाही. त्याला खूप बदनाम करण्यात आलंय. तो गुणी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. सनी देओल माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्वात काळा अध्याय आहे, पण देव आहे, तो सगळं बघतोय, तो न्याय करेल.”
ते खूप शक्तिशाली लोक, त्यांना कशाचाच फरक पडत नाही – सुनील दर्शन
सनी देओलबरोबरचा वाद नेमका काय होता, तेही सुनील दर्शन यांनी सांगितलं. “ते खूप शक्तिशाली लोक आहेत आणि त्यांना कशाचाच फरक पडत नाही. पण या सगळ्याचा न्याय कधीतरी होईलच याची मला खात्री आहे. काही गोष्टी इतक्या वाईट आहेत, ज्या मी शब्दांत सांगू शकत नाही. मी त्याच्याबरोबर तीन चित्रपट केले, मी माझा पहिला चित्रपट ‘इंतेकाम’ त्याच्याबरोबर केला. त्यावेळी तो मोठा स्टार नव्हता. मी त्याच्या बऱ्याच चित्रपटांचं वितरण केलं होतं. त्याला ज्या चित्रपटातून लाँच करण्यात आलं, त्यात माझं मोठं योगदान होतं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं की चित्रपटसृष्टीला त्याच्यासारख्या लोकांची गरज आहे,” असं सुनील म्हणाले.
सनीबरोबर काम करणं म्हणजे लहान मुलाचे लाड पुरवणं – सुनील दर्शन
“इंतेकाम करताना मी थोडा गोंधळलो होतो. पण ‘लूटेरे’ हा दुसरा चित्रपट करताना मला त्याच्या वागण्यात फरक जाणवला. पण तिसऱ्यांदा जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा काहीतरी गडबड आहे याची मला खात्री पटली. प्रॉडक्शनदरम्यान मला वाईट अनुभव आले. मला तो खूप महागात पडला. ते एखाद्या लहान मुलाचे लाड पुरवून काम पूर्ण करायला लावण्यासारखं होतं. मला त्याच्याबरोबर चौथा चित्रपट करायचा नव्हता, पण मी अडकलो होतो. त्याने माझ्या भावनांचा वापर केला, खोट्या गोष्टी सांगितल्या आणि तो स्वतःसाठी करत असलेल्या एका प्रकल्पात त्याने मला सामील करून घेतलं,” असं सुनील दर्शन म्हणाले.
दरम्यान, सुनील दर्शन यांनी एकेकाळी सनीबरोबर काही चित्रपट केले होते, पण या अनुभवांनंतर परत त्यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. अक्षय कुमारच्या बाबतीतही असंच घडलं. सात चित्रपट केल्यानंतर अक्षय व सुनील दर्शन यांची जोडी वेगळी झाली. ते परत कधीच एकत्र दिसले नाहीत.
