Sunidhi Chauhan Spoke About Her Broken Marriage : सुनिधी चौहान लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. तिनं आजवर अनेक गाणी गात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या सुमधुर आवाजानं भुरळ घालणाऱ्या सुनिधी चौहानचं आयुष्य मात्र खडतर राहिलं आहे.

सुनिधी चौहाननं ‘शीला की जवानी’, ‘कांदे पोहे’, ‘धूम मचा ले’, ‘बिन तेरे’, ‘भागे रे मन’ यांसारखी असंख्य गाणी गायली आहेत. सुनिधी व्यावसायिक आयुष्यामुळे जितकी चर्चेत आहे, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत राहिली आहे. या गायिकेनं वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षीच आंतरधर्मीय लग्न केलं होतं. त्या लग्नाला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता.

१८व्या वर्षी केलेलं आंतरधर्मीय लग्न

सुनिधी चौहाननं अवघ्या १८ व्या वर्षी कोरिओग्राफर बॉबी खानशी लग्न केलं होतं. पण, त्यानंतर सुनिधी चौहानच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि मग लग्नानंतरच्या अवघ्या एका वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुनिधीनं त्याबद्दल एका मुलाखतीतही सांगितलं होतं. तिनं तिच्या मोडलेल्या लग्नामुळे तिला माणूस म्हणून घडण्यात मदत झाल्याचं म्हटलं होतं.

‘बॉलीवूड बबल’शी संवाद साधताना गायिका त्याबद्दल म्हणालेली, “या सगळ्या गोष्टींकडे मी वेगळ्या नजरेने बघितलं. मला त्यावेळी माझ्या आई-वडिलांची खूप साथ लाभली. त्यामुळे आता मला या सगळ्याचा त्रास होत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येत असतात. फक्त तुम्ही स्वत:ला त्यात किती काळ अडकवून ठेवताय या गोष्टीने फरक पडतो. कारण फार काळ दु:खी राहू शकत नाही. तुम्हाला स्वत:ला प्रोत्साहन द्यावं लागतं, तुम्हाला स्वत:चा मित्र बनावं लागतं.”

उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना सुनिधीनं घटस्फोट घेतलेल्या स्त्रियांकडे लोक कसे वेगळ्या नजरेने पाहतात याबद्दलही प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणालेली, “वेळ बदलत आहे आणि जे लोक वैचारिकदृष्ट्या प्रगती करीत नाहीत, त्याच लोकांना अशा गोष्टींचा त्रास होतो.”