एकेकाळी सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांना बॉलिवूडमधील प्रतिस्पर्धी मानलं जायचं. मात्र, त्यांची खरी ताकद पडद्यावर एकत्र काम करताना दिसली. अॅक्शन चित्रपटांमधून त्यांनी एकत्र काम करायला सुरू केलं पुढे विनोदी भूमिकाही साकारत या जोडीने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.
‘मोहरा’, ‘हेरा फेरी’, ‘धडकन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. आता ‘वेलकम टू द जंगल’मधून ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी अक्षय कुमारबरोबरच्या कथित स्पर्धेबाबत भाष्य केलं. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांत या दोघांनी तब्बल १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
अक्षय कुमारबद्दल काय म्हणाले सुनील शेट्टी?
चित्रपटातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि अक्षय कुमारबरोबरच्या कथित स्पर्धेबाबत बोलताना सुनील शेट्टी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “स्पर्धेपेक्षा आमच्या पात्रांमध्ये कितीही संघर्ष झाला तरी शेवटी मैत्रीच जिंकते. आमच्या चित्रपटांमध्ये हे नेहमीच पाहायला मिळालं आहे. हिंदी चित्रपटांचा हाच एक यशस्वी फॉर्म्युला राहिला आहे आणि तो आमच्यासाठीही कायम यशस्वी ठरला आहे.”
ते पुढे म्हणाले, “वक्त हमारा है, मोहरा, धडकन अशा चित्रपटांमध्ये आमच्या पात्रांमध्ये संघर्ष दाखवला गेला होता आणि प्रेक्षकांनी तोही खूप पसंत केला. वेलकम टू द जंगलमध्येही दिग्दर्शकाने हाच फॉर्म्युला वापरला आहे. कारण या चित्रपटात अक्षय आणि माझं अजिबात पटत नाही.” सुनील शेट्टी पुढे म्हणाले, “प्रेक्षकांनी चित्रपटाचा आनंद घ्यावा, हाच आमचा उद्देश असतो आणि चित्रपटात तेच दाखवलं आहे. एकमेकांची खिल्ली उडवणं, चिडवाचिडवी करणं, हे सगळं मजेशीर पद्धतीने दाखवलं आहे. चित्रपटात भरपूर धमाल आहे.”
याशिवाय सुनील यांनी अक्षय कुमारचंही भरभरून कौतुक केलं. ते म्हणाले, “अक्षयने त्याचं करिअर, फिटनेस आणि एकूणच आयुष्य ज्या शिस्तीने सांभाळलं आहे, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. विशेषतः विनोदी भूमिकांमधील त्याचं टायमिंग अप्रतिम आहे.” याच मुलाखतीत तब्बल २२ वर्षांनंतर अक्षय कुमारबरोबर पुन्हा स्क्रीन शेअर करणाऱ्या रवीना टंडननेही त्याचं मनापासून कौतुक केलं.
रवीना म्हणाली, “अक्षय हा पूर्वीही अत्यंत समर्पित कलाकार होता आणि आजही आहे. भविष्यातही तो तसाच राहील. एखाद्या चित्रपटासाठी तो जितकं योगदान देतो, ते खरंच कौतुकास्पद आहे. फरक इतकाच की आता त्याची मेहनत आणि सहभाग दुपटीने वाढला आहे. आम्ही इंडस्ट्रीत आलो तेव्हा आम्ही तरुण होतो आणि नवीन गोष्टी शिकत होतो, पण आता अक्षयने कलेवर पूर्ण प्रभुत्व मिळवलं आहे”.
