सध्याच्या काळात सोशल मीडिया लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. बाहेर फिरायला गेल्यावर लगेच फोटो काढून पोस्ट करणं, जेवायला गेल्यावर फोटो काढणं अशा गोष्टी सामान्य झाल्या आहेत. जेवण थंड झालं तरी चालेल, पण फोटो महत्त्वाचा, असे बरेच लोक तुमच्या सभोवतालीही असतील. त्यांना या गोष्टीत आनंद वाटतो. पण सुनील शेट्टीने आनंदी राहण्यासाठी फार काही करावं लागत नाही, असं म्हटलंय.

बॉलीवूडचा ‘अण्णा’ म्हणजेच सुनील शेट्टी हा त्याच्या फिटनेसबरोबर त्याच्या सकारात्मक विचारांसाठीही ओळखला जातो. सुनील शेट्टी कौटुंबीक व्यक्ती आहे. त्याला आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला फार आवडतं. त्याने एका मुलाखतीत आनंदी राहण्यासाठी माणसाला फार मोजक्या गोष्टी लागतात, असं मत व्यक्त केलं आहे.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सुनील शेट्टीने म्हटलं की, सोशल मीडियाने आपल्या आनंदाच्या व्याख्येत हळूहळू बदल केला आहे. आताच्या काळात आनंद हा मनातून अनुभवण्यापेक्षा तो इतरांना दाखवण्याची एक गोष्ट बनली आहे, असं सुनील शेट्टीने नमूद केलं.

Award Banner

घरात वरण-भात, लोणचं…

सुनील शेट्टी म्हणाला, “सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्यासाठी आपल्याला अमूक-अमूक गोष्टी करण्याची गरज आहे, असा आपला समज झाला आहे. पण ते वास्तव नाही. मी नेहमी म्हणतो की, खरंच मनापासून आनंदी राहण्यासाठी घरात वरण-भात, लोणचं आणि त्याचबरोबर आई-बाबा, पत्नी, मुलं असतील तर त्याहून मोठं सुख नाही.

आनंदी दिसण्यासाठी खटाटोप करावा लागतो- सुनील शेट्टी

सोशल मीडियाचा उल्लेख करत सुनील म्हणाला, “पण आनंदी दिसण्यासाठी मात्र आपल्याला चांगल्या हॉटेलची गरज भासते, तिथे फोटो काढवा लागतो… आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा तुम्ही जेवायला सुरुवात करता, तेव्हा जेवण थंड झालेलं असतं. आनंदी दिसण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो, पण खऱ्या अर्थाने आनंदी राहण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते.”

हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण थंड झाले तरी चालेल पण फोटो काढणे महत्त्वाचे वाटते, या मानसिकतेवर अभिनेता सुनील शेट्टीने परखड मत व्यक्त केले आहे. मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला की, आजकाल आनंद हा अनुभवण्यापेक्षा तो इतरांना दाखवण्याची गोष्ट बनली आहे. खऱ्या सुखासाठी महागड्या हॉटेलची नाही, तर घरात बनवलेला वरण-भात, लोणचं आणि सोबत आई-वडील, पत्नी व मुले असणे हेच सर्वात मोठे समाधान आहे. सोशल मीडियामुळे आनंदाची व्याख्या बदलत चालली असून, माणूस दिखाव्याच्या मागे धावत असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले.