Suniel Shetty On Son’s Border 2 : सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीचा ‘बॉर्डर २’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहे. अनेकांच्या पसंतीस उतरेलेला ‘बॉर्डर २’ चित्रपट अजून सुनील शेट्टीनं पाहिलाच नाहीय. याबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे

‘बॉर्डर २’ने सहा दिवसांत भारतात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर जगभरात या चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र, सुनील शेट्टी यांनी अजून स्वत:च्या मुलाचा हा सिनेमा पाहिलेला नाही. जगभरात ५०० कोटी कमावल्यानंतरच हा सिनेमा पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘बॉर्डर-२’च्या प्रीमियरला थिएटरबाहेर बसलेले सुनील शेट्टी

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी ‘बॉर्डर २’च्या प्रीमियरची आठवण सांगितली. त्यावेळी पत्नी माना शेट्टी, मुलगी अथिया शेट्टी आणि जावई के. एल. राहुल यांनी अहानबरोबर ‘बॉर्डर २’ चित्रपट पाहिला. पण सुनील शेट्टी मात्र थिएटरबाहेरच थांबले होते. याबद्दल त्यांनी “मी तब्बल साडेतीन तास थिएटरबाहेर बसून लोकांना भेटत होतो आणि सगळ्यांकडून कौतुक ऐकत होतो,” असे सांगितले.

अहानसाठी मी देवाकडे ही इच्छा व्यक्त केली आहे की…

यानंतर सुनील शेट्टी म्हणाले, “पहिल्याच दिवसापासून मी ठरवलं होतं की, ‘बॉर्डर २’ जगभरात ५०० कोटींची कमाई करत नाही तोपर्यंत मी चित्रपट पाहणार नाही. अहानच्या सिनेमासाठी मी देवाकडे ही इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत मी सिनेमाचा एकही सीन पाहिलेला नाही.”

‘बॉर्डर-२’ ५०० कोटींची कमाई करेल, अशी मला आशा…

जर ‘बॉर्डर २’ने ५०० कोटींचा टप्पा गाठला नाही, तर काय कराल? असा प्रश्न विचारल्यावर सुनील शेट्टी म्हणाले की, “मला पूर्ण विश्वास आहे. सिनेमा ५०० कोटींची कमाई करेल आणि माझी प्रार्थना नक्की पूर्ण होईल. मानाला (सुनील शेट्टींची पत्नी) चित्रपट खूप आवडला आहे. ज्यांनीही हा चित्रपट पाहिला आहे, त्यांनी अहानच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे.”

‘५०० कोटींची कमाई केली तर मी पूर्ण कुटुंबाबरोबर…

यापुढे सुनील शेट्टी म्हणाले, “मी अहान, त्याचे मित्र आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबरच हा चित्रपट पाहणार. तसंच सनी देओल, वरुण धवन आणि बाकी सगळेही असतील. त्यांच्यासाठी कदाचित तो दुसऱ्यांदा असेल, पण मी पहिल्यांदाच पाहीन. त्यानंतर मी कितीवेळा सिनेमा पाहीन, ते मलाही माहीत नाही. मला अहानचा अभिमान आहे. ‘बॉर्डर २’ हाच सिनेमा त्याला करायचा होता, यावर त्याचा ठाम विश्वास होता.”

दरम्यान, अहान शेट्टीसह ‘बॉर्डर २’मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, मोना सिंग, सोनम बाजवा, आन्या सिंग आणि मेधा राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निधी दत्ता आणि भूषण कुमार यांनी केली आहे. हा बॉर्डरचा सीक्वेल असून, चित्रपटाने आतापर्यंत जगभरात २७० कोटींहून अधिक कमाई केली आहे.