Suniel Shetty Hasn’t Watched Border 2 : ९० च्या काळात बॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या अनेक कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. त्यापैकीच एक अभिनेते म्हणजे सुनील शेट्टी. सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी सध्या त्याच्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
९० च्या काळात जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यामध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र झळकले होते. अशातच आता अनेक वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अहान शेट्टी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहे. परंतु, सुनील शेट्टी यांनी अद्याप त्यांच्या मुलाचा चित्रपट पाहिलेला नाही.
सुनील शेट्टी यांनी ‘या’ कारणामुळे पाहिला नाहीये ‘बॉर्डर २’
सुनील शेट्टी यांनी, जोवर ‘बॉर्डर २’ हा चित्रपट ५०० कोटींची कमाई करत नाही, तोपर्यंत ते हा चित्रपट पाहणार नाहीत, अशी शपथ घेतली होती. आता त्यांनी याबद्दल पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टी त्यांच्या मुलाच्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटाबद्दल काय म्हणाले, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
२३ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे आणि आता हा चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या कमाईचा टप्पा गाठणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुनील शेट्टी यांनी त्यांचा शब्द पाळला. सुनील यांनी अजूनही त्यांच्या मुलाचा हा चित्रपट पाहिलेला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल हा देशभक्तीपर चित्रपट असल्यामुळे या चित्रपटानं ५०० कोटींची कमाई केलीच पाहिजे, असं म्हटलं आहे.
ए.बी.पी.शी संवाद साधताना सुनील शेट्टी याबद्दल म्हणाले, “मी खूप आधीच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी असं ठरवलेलं की, हा एक देशभक्तीपर चित्रपट असल्यामुळे या चित्रपटानं ५०० कोटींची कमाई केलीच पाहिजे आणि तेव्हाच मी ठरवलेलं की, तरच मी हा चित्रपट पाहीन.” सॅकनिल्कच्या वृत्तानुसार सनी देओलच्या ‘बॉर्डर २’नं आतापर्यंत जगभरात जवळपास ४४७ कोटींची कमाई केली आहे. सुनील पुढे म्हणाले, “मला असं वाटतंं की, एका वडिलांच्या प्रेमापोटी देवाच्या कृपेनं हा चित्रपट ५०० कोटींची कमाई करेल. ते माझे शब्द होते, त्या माझ्या भावना होत्या; पण आता आम्ही त्यामध्ये अडकलो आहोत आणि त्यामुळेच मी अजूनही चित्रपटातील एक फ्रेमसुद्धा पाहिलेली नाही.”
