Suniel Shetty Talks About Bollywood’s Historical Films : सुनील शेट्टी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. इंडस्ट्रीत घडणाऱ्या घडामोडींबद्दल ते नेहमी त्यांच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे मांडत असतात. अशातच त्यांनी अकबर, बाबर यांच्यावर ऐतिहासिक चित्रपट बनवले जातात; पण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजपूत राजांवर चित्रपट का बनत नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सुनील शेट्टी यांनी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी वीर’ चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट गुजरात येथील सोमनाथ मंदिर किती वेळा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला यावर आधारित आहे; पण बॉक्स ऑफिसवरून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं तो लवकर हटवण्यात आला. अशातच ‘लेहरे रेट्रो’शी संवाद साधताना त्यांनी हा चित्रपट का चालला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज व राजपूत राजांवर चित्रपट का बनले नाहीत यावर भाष्य केलं आहे.

सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाले?

सुनील शेट्टी म्हणाले, “चित्रपट बनवण्यापूर्वी आम्ही खूप संशोधन केलं. पण, दुर्दैवानं चित्रपटाचं डिस्ट्रिब्युशन फार चांगलं झालं नाही. डिस्ट्रिब्युशन महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला थिएटर मिळालं नाही, निर्मात्याचं मोठं नुकसान झालं. कारण- तो स्वत: डिस्टिब्युशनचं काम पाहत होता; पण त्यात यश आलं नाही. एका चांगल्या चित्रपटाचं नुकसान झालं.” सुनील शेट्टी यांना पुढे त्यांना खरंच हा विषय इतका भावला होता का, असं विचारलं.

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाले, “आपण औरंगजेब, अकबर, बाबर आणि बिरबल यांच्याबद्दल का बोलतो? आपला इतिहास आपल्या संस्कृतीबद्दल असायला हवा. वेद, राजपूत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरांबद्दल बोललं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्यातील महापुरुषाबद्दल बोललं गेलं पाहिजे.”

पृथ्वीराज चौहान या चित्रपटाचं प्रमोशन करताना अक्षय कुमारनंही या मुद्द्यावर प्रकाश टाकलेला. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार तो म्हणालेला, “दुर्दैवानं आपल्या इतिहासातील पुस्तकांमध्ये दोन ते तीन ओळीच आहेत. तर बाहेरून आलेल्या परक्यांबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आहे. आपल्या संस्कृती, आपल्या महाराजांबद्दल फार कमी माहिती आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दलची बरीच माहिती तर मला स्वत:ला माहीत नव्हती.”