Sunil Shetty Rejected An Advertisement Worth 40 Crore Rupees : बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुनील शेट्टी व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. सुनील शेट्टी त्यांच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतात. अशातच आता यासाठी त्यांनी चक्क ४० कोटींच्या जाहिरातीला नकार दिल्याचं म्हटलं आहे.
सुनील शेट्टी फार मोजक्या कलाकृतींमधून आता प्रेक्षकांच्या भेटीला येतात; पण असं असतानाही ते कायम चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दल स्पष्टपणे त्यांची मतं व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी ‘पिपिंग मून’शी संवाद साधताना २०१७ मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते खूप दु:खी झाले होते आणि त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलेला. त्याबद्दल सांगितलं आहे.
सुनील शेट्टी याबद्दल म्हणाले, “माझ्या वडिलांचे २०१७ मध्ये निधन झाले; परंतु ते त्यापूर्वीपासून म्हणजे २०१४ पासूनच आजारी होते आणि मी त्यांची काळजी घेत होतो. मी मानसिकदृष्ट्या ठीक नव्हतो. मी पूर्णपणे काम सोडून दिलं होतं. पण, त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि त्याच सकाळी मला एका हेल्थ शोची ऑफर आली. मला तो एक संकेत वाटला आणि मी पुन्हा काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मी काही दाक्षिणात्य चित्रपट केले. पण, जेव्हा तुम्ही ६-७ वर्षांचा ब्रेक घेता तेव्हा तुम्हाला सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखं वाटतं.”
सुनील शेट्टी पुढे म्हणाले, “कोविडनंतर मी स्वत:कडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागलो. मी खूप खंबीर बनलो आणि देव दयाळू असतो. जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडली आहे. तेव्हा न मागता माझ्याकडे कसे ना कसे पैसे यायचे. त्यामुळे मला एक नवीन आत्मविश्वास मिळाला.”
४० कोटींच्या जाहीरातीची ऑफर नाकारली
मुलाखतीत सुनील शेट्टी यांना दुसरे कलाकार तंबाखूच्या ब्रँड्सच्या जाहिराती करतात. त्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, ते ठरवून अशा जाहिराती करीत नाहीत. ते म्हणाले, “मला एका तंबाखूच्या जाहिरातीसाठी ४० कोटींची ऑफर आली होती. मी ऑफर घेऊन आलेल्या लोकांकडे पाहिलं आणि म्हटलं की, तुम्हाला खरंच वाटतं का की, मी पैशांसाठी असं काहीतरी करेन. मी अजिबात असं करणार नाही. त्यामुळे आता कोणीही माझ्याकडे अशी ऑफर घेऊन येण्याची हिंमत करत नाही.मला त्यावेळी पैशांची गरज होती; पण मी अशा प्रकारे ते कमवू शकत नव्हतो. कारण- ही अशी गोष्ट आहे, ज्यावर माझा विश्वास नाही. मी असं काहीही करणार नाही, ज्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना उद्या काही ऐकावं लागेल.”
