Suniel Shetty Fitness : बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या फिटनेसची सोशल मीडियावर कायमच चर्चा होताना दिसते. आताचे नवीन स्टार्स त्यांच्या लूकचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या फोटोमुळे अनेक चाहत्यांच्या मनात या कलाकारांच्या फिटनेसविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. असाच आपल्या फिटनेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी.
बॉलीवूडचा हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी आजही आपल्या फिटनेससाठी तितकाच लोकप्रिय आहे. वयाच्या ६४ व्या वर्षीही तो तितकाच फिट दिसतो. सुनील शेट्टी सोशल मीडियावर आपले एब्स दाखवत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. तो आपल्या आहार आणि व्यायाम दोन्ही गोष्टींबाबत अतिशय शिस्तबद्ध आहे. चला जाणून घेऊया त्याच्या फिटनेस आणि डाएटबद्दल काही खास गोष्टी.
सुनील शेट्टीचा आहार
‘झेरोधा’चे सह-संस्थापक निखिल कामत यांच्याबरोबरच्या एका जुन्या पॉडकास्टमध्ये सुनील शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, “जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी प्रोटीनयुक्त नाश्ता करतो. मी रोज चार अंडी खातो. मला डेअरी प्रॉडक्ट्स फारसे सूट होत नाहीत, त्यामुळे मी दूध वगैरे गोष्टी टाळतो.” दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात सुनील शेट्टी साधारण १५० ते २०० ग्रॅम मासे किंवा चिकन खातो. सुनीलच्या दैनंदिन आहारात सुमारे १६०० ते १७०० कॅलरीज असतात, ज्यामुळे त्याच्या वर्कआउटसाठी पुरेसा आधार मिळतो.
“मी साखर खातो; कारण…”
साखर खाऊ नये हा सल्ला अनेक सेलिब्रिटी देताना दिसतात. अनेक सेलिब्रिटी आहेत, जे साखरेचं सेवन करत नाहीत. मात्र, सुनील शेट्टी साखर खातो. साखरेबद्दल बोलताना सुनील म्हणाला, “हो, मी साखर खातो, कारण मला साखरेचे पर्याय (substitutes) मान्य नाहीत. माझ्यासाठी साखर म्हणजे साखर किंवा फळे.” सुनील शेट्टी सकाळी एक कप चहा आणि संध्याकाळी दुसरा कप चहा घेतो. या दोन्ही वेळा कोणतीही अपराधीपणाची भावना न बाळगता तो त्या चहाचा आनंद घेतो.
“संध्याकाळी सातनंतर जेवत नाही…”
कडक डाएट फॉलो करूनही सुनीलला गोड खूप आवडतं. तो म्हणतो, “मला फळं आणि गोड खूप आवडतं. जर कोणी मला सांगितलं की जेवणानंतर गोड नाही खायचं तर मी वेडा होईन!” तसंच सुनील रात्री सात वाजल्यानंतर काही खात नाही. त्याला आपल्या अन्नाला पचायला पुरेसा वेळ द्यायला आवडतो.
सुनील शेट्टीचे आगामी प्रोजेक्ट्स
सुनील शेट्टी लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पाटनी, रवीना टंडन आणि श्रेयस तळपदे असे अनेक कलाकार झळकणार आहेत. याशिवाय सुनील शेट्टी ‘हेरा फेरी ३’ मध्येही दिसणार आहे.
