जेपी दत्ता यांचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. बॉर्डर १३ जून १९९७ रोजी प्रदर्शित झाला होता. यात जॅकी श्रॉफ, सनी देओल, अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी यांनी काम केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगचे बरेच किस्से आहेत. एकदा सुनील शेट्टीने या सिनेमातील गाण्याची आठवण सांगितली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीचं एक गाणं बॉर्डरमध्ये आहे, त्या शूटिंगची रात्र कधीच विसरणार नाही, असं सुनील शेट्टीने म्हटलं होतं.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ मधील ‘तो चलू…’ या गाण्याच्या शूटिंगची आठवण सांगितली होती. शूटिंग दरम्यान सुनील शेट्टी खूप घाबरला होता, कारण ते गाणं लग्नाच्या पहिल्या रात्रीचं होतं. ‘सुहागरात’ हा शब्द ऐकूनच टेन्शन यायचं की हे गाणं कसं होईल, असं सुनील शेट्टीने म्हटलं होतं. पण जेव्हा जेपी दत्ता यांनी हे गाणं ऐकवलं, तेव्हा समजलं की ते हे गाणं योग्य पद्धतीने शूट करू शकतात. हे गाणं खूप चांगल्या पद्धतीने शूट केलं होतं की आपण ते गाणं केलंय असा विश्वासच बसत नाही, असं सुनील शेट्टी म्हणाला होता.

सुनील शेट्टीने सांगितलं होतं की एक सीन करताना तो थांबला होता. “जेव्हा जवान घराबाहेर पडतो, तो आपलं प्रेम कसं घरी सोडून निघून जाईल, याबद्दल जेपी दत्तांबरोबर चर्चा सुरू होती. पण अचानक त्या सीनमध्ये म्युझिक टाकण्यात आलं. मी वर पाहिलं आणि असाच सीन हवा आहे, असं त्यांनी म्हटलं. गाण्यात वर पाहण्याचा अर्थ युद्ध सुरू झालंय असा होता,” असं सुनील शेट्टी म्हणाला होता.

ती रात्र कधीच विसरणार नाही – सुनील शेट्टी

सुनील शेट्टी ‘बॉर्डर’मध्ये काम करत असताना त्याची लेक अथिया शेट्टीला खूप ताप आला होता. “तेव्हा ती ३ वर्षांची होती. तिला खूप ताप आला होता, त्यामुळे तिला परत घरी पाठवलं होतं. पण शूटिंग करताना मी वारंवार फोन करून ती घरी पोहोचली की नाही याबाबत विचारत होतो. तिला मुंबईला जायचं होतं, पण खूप ताप असल्याने तिला दिल्लीला पाठवावं लागलं होतं. त्यामुळे ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यामुळे जेपी दत्ताही काळजीत होते,” असं सुनील शेट्टीने म्हटलं होतं.

सुनील शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘हेरा फेरी 3’ मुळे चर्चेत आहे. लवकरच प्रेक्षकांना अक्षय कुमार, सुनील शेट्टी व परेश रावल ही जोडी या सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.