Suniel Shetty Talks About Bollywood Working Hours : सुनील शेट्टी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर १०० हून अधिक चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या साठीतही अभिनेते काम करत आहेत. अशातच त्यांनी सध्या बॉलीवूडमधील काम करण्याच्या तासांवरून सुरू असलेल्या वादाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील शेट्टी यांनी १२ ते १८ तास काम करणं त्यांच्यासाठी योग्यही नाही आणि त्यांना ते शक्यही वाटत नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी वर्क लाइफ बॅलन्स, ब्रेक आणि आरामाचं महत्त्व सांगितलं आहे. सुनील शेट्टी म्हणाले, “याच इंडस्ट्रीत काम करीत असूनही मी माझं आयुष्य माझ्याप्रमाणे जगतो.”
दीपिकाच्या ‘८ तास काम’ मागणीवर सुनील शेट्टींचं स्पष्ट मत
कामाच्या तासांबद्दल अभिनेते पुढे म्हणाले, “मी फक्त कामाच्या वेळीच काम करतो. जर ९ ते ६, अशी वेळ आहे, तर मी फक्त ९ ते ६ पर्यंतच काम करतो. जर कधीतरी माझा निर्माता अडचणीत असेल, तर मी त्याच्यासाठी ९ ते ९ सुद्धा काम करू शकतो. हा समजूतदारपणा असणं महत्त्वाचं आहे. नाही तर मग तुमच्या माझ्याकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.” सुनील शेट्टी यांनी मिड-डेशी संवाद साधताना याबद्दल सांगितलं.
सुनील शेट्टी यांनी सांगितलं फिटनेसचं महत्त्व
फिटनेसचं आणि काम करीत असताना मधल्या ब्रेकचं महत्त्व सांगत सुनील शेट्टी म्हणाले, “मी ॲक्शन हीरो म्हणून काम करायचो. जर मला ब्रेक मिळाला नाही किंवा माझं जेवण वेळेवर झालं नाही, तर मी सर्वांत जास्त चिडचिड करणारीव्यक्ती होतो. मला ब्रेकची गरज असते. कारण- त्यामुळेच मला ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तुम्हाला माझ्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा असेल, तर मला ब्रेक द्या.”
सुनील शेट्टी पुढे ब्रेकचं महत्त्व अधोरेखित करीत म्हणाले, “मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की, अति प्रमाणात काम करून किंवा सतत स्वतःच्या मर्यादेपेक्षा स्वतःला जास्त प्रोत्साहन देऊन सतत काम करून तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवू शकत नाही. माझ्यासाठी फिटनेस म्हणजे माझं आयुष्य आहे. आज वयाच्या ६५ व्या वर्षी मी जो काही आहे, तो फक्त फिटनेसमुळेच. “
दरम्यान, सुनील शेट्टी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सुनील शेट्टी ‘भारत के सुपर फाउंडर्स’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामध्ये देशभरातील अनेक उद्योजक सामील होणार आहेत.
