Suniel Shetty Talks About Akshaye Khanna & Ranveer Singh : आदित्य धर लिखित व दिग्दर्शित ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. चाहत्यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनीही चित्रपटाचं आणि कलाकारांचं कौतुक केलं. अशातच आता सुनील शेट्टीनेही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दल प्रतिक्रिया देत असतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘धुरंधर’ चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांच्या कामाचंही कौतुक केलं आहे. ‘एनडीटीव्ही’शी संवाद साधताना सुनील शेट्टी यांनी दिग्दर्शक आदित्य धरचंही खूप कौतुक केलं आहे.
अदित्य धरबद्दल सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया
आदित्य धरचं कौतुक करताना सुनील शेट्टी म्हणाले, “त्याला जाणीव झाली की लोकांमध्ये ओटीटीची खूप क्रेझ आहे, म्हणून त्याने लोकांना सांगितलं तुम्हाला ओटीटी हवं आहे ना? मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर हा अनुभव देणार. मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर चार तासांचा कंटेंट देणार आणि लोकांनी त्याला खूप प्रेम दिलं.”
सुनील शेट्टी यांनी केलं अक्षय खन्ना व रणवीर सिंहचं कौतुक
चित्रपटातील कलाकारांच्या कामाबद्दल सुनील शेट्टी म्हणाले, “कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. अक्षय खन्नाच्या कामासाठी मी १० पैकी १० गुण देईन; तर रणवीर सिंहला मी दहापैकी १०० गुण देईन. रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे.” अभिनेते पुढे म्हणाले, “अक्षय खन्ना उत्तम अभिनेता आहे, पण रणवीरने संयम दाखवला, त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवलं आणि ही सर्वात कठीण गोष्ट आहे. नायकाच्या भूमिकेतून देशभक्ती दाखवणं सोपं आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं, पण दुसऱ्या देशात बसून स्वत:च्या मातृभूमीसाठी त्रास सहन करणं आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं खूप कठीण आहे.”
रणवीर सिंहच्या भूमिकेबद्दल सुनील शेट्टी पुढे म्हणाले, “मी ‘धुरंधर २’मध्ये रणवीर सिंहला पाहण्यासाठी उत्सुक आहे. तो मुलगा खूप कमाल आहे.” ‘धुरंधर’ चित्रपटाचा दुसरा भाग याच वर्षी १९ मार्च रोजी प्रदर्शित होणर असून सध्या त्याच्या टीझर आणि ट्रेलरवर काम सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
