untold stories of Sanjay Dutt’s arrest & Sunil Dutt’s reaction during 1993 investigation : संजय दत्त बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता तर आहे, पण तरुणपणी त्याची प्रतिमा  ‘बिघडलेला मुलगा’ अशी होती. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा मुलगा असूनही तो अनेकदा चुकीच्या गोष्टींमुळेही चर्चेत आला आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार संजय दत्त अनेक वाद-विवादांमध्ये अडकला. त्यात व्यसनाधीनता, अंडरवर्ल्डशी संबंध आणि १९९३ बॉम्बे ब्लास्ट प्रकरणातील त्याचा संबंध अशा गोष्टींमुळे त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप झाला होता. नंतर त्याला 9mm पिस्तूल, AK-56 रायफल, हँड ग्रेनेड्स आणि दारुगोळा ठेवण्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं.

संजय दत्तला अटक का झालेली?

अलीकडेच या प्रकरणाची चौकशी करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त एम.एन सिंह (MN Singh) यांनी Hussain Zaidi Files या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या तपासाबद्दल सविस्तर माहिती पुन्हा सांगितली. एम.एन सिंह यांनी सांगितलं की, “त्या काळात अंडरवर्ल्डकडून पाकिस्तानमधून शस्त्रं आणली जात होती. संजय दत्त दाऊद इब्राहिमलाही भेटला होता आणि त्यानंतर ही शस्त्रं त्याच्या घरी पोहोचवण्यात आली. अबू सालेम या दाऊदच्या धाकट्या भावाच्या सांगण्यावरुन ही शस्त्रं देण्यासाठी आला होता. त्यामुळे संजय दत्तने ही शस्त्रं स्वीकारल्याचं समजल्यावर आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला होता.”

एम.एन सिंह पुढे म्हणाले,  “त्या काळात सुनील दत्त राजकारणी होते आणि त्यांची खूप चांगली प्रतिमा होती. त्यामुळे संजय दत्तचा या प्रकरणात सहभाग असल्याचं समजल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला, आम्हाला यावर विश्वास बसत नव्हता. संजय दत्त असं काही करू शकत नाही म्हणून नाही, तर सुनील दत्त यांच्यामुळे. ते खूप चांगले आणि सन्माननीय व्यक्ती होते. पण दंगलीच्या काळात संजय दत्तने शस्त्रं घेतल्याची माझ्याकडे ठोस माहिती होती, तर मी त्याकडे दुर्लक्ष कसं करू शकलो असतो? तो स्टार आहात म्हणून हे प्रकरण सोडून द्यायचं का? ते शक्य नव्हतं.”

याबद्दल ते पुढे म्हणाले, “संजय दत्तला बोलावून चौकशी करण्यात आली. त्याने आपल्या कृतीची कबुली दिली. तो म्हणालेला, हो, मी शस्त्रं घेतली होती, पण ती माझी चूक होती. दंगलीच्या काळात धमक्या येत असल्यामुळेच गँगस्टर्सशी संपर्क केला आणि शस्त्रं घरी आणली. यावर सिंह म्हणाले, तुमच्याकडे आधीच परवानाधारक शस्त्रं होती आणि घराबाहेर पोलिस सुरक्षा होती. तरीसुद्धा तुम्ही AK-56 रायफल, गोळ्या आणि हँड ग्रेनेड्स घेतले. वैयक्तिक सुरक्षेसाठी अशी शस्त्रं ठेवली जात नाहीत. यानंतर संजय दत्तने त्याची चूक मान्य केली आणि त्याला अटक करण्यात आली.”

सिंह यांनी पुढे सांगतिलं की, या तपासादरम्यान त्यांच्यावर खूप दबाव होता. सुनील दत्त अनेकदा त्यांना भेटून आपल्या मुलाला वाचवण्याची विनंती करत असत. ते म्हणायचे, “मुलगा थोडा वेडा आहे (लडका बेवकूफ है).” यावर सिंह म्हणाले की, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं, कारण संजय दत्त हा ओळखीचा चेहरा होता आणि संपूर्ण जगाला या प्रकरणाची माहिती होती. त्यामुळे हे प्रकरण सोडून देणं शक्य नव्हतं. त्यावेळी

सुनील दत्त यांनी TADA (दहशतवादविरोधी कायदा) लागू करू नये अशीही विनंती केली. त्यावर सिंह म्हणाले की, “तो दहशतवादी नसला तरी त्याने दहशतवाद्यांना मदत केली होती, आणि तोही गंभीर गुन्हा आहे.” एम.एन सिंह पुढे म्हणाले, “एक अधिकारी म्हणून मला माझं कर्तव्य पार पाडावं लागलं. अशा प्रकरणात मी कुणालाही मदत करू शकत नाही. माझ्या या निर्णयामुळे अनेक लोक नाराज झाले होते, पण त्याच्याविरुद्धची केस गंभीर होती, म्हणूनच पुढे दोषी ठरवण्यात आलं.”

संजय दत्तच्या कृतीमुळे सुनील दत्त यांना बसलेला धक्का

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार संजय दत्तच्या चौकशीबद्दल माजी पोलिस उपायुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या *Let Me Say It Now* या आत्मचरित्रात माहिती दिली आहे. सुरुवातीला संजय दत्तने आरोप नाकारले, पण नंतर त्याने त्याची चूक मान्य केली असं लिहिलं आहे. सुनील दत्त त्यांच्या मुलाच्या निरपराधत्वाबद्दल बोलत असताना, संजय दत्तला आत आणण्यात आलं आणि त्याने त्याच्या वडिलांसमोरच त्याची चूक मान्य केली. हे पाहून सुनील दत्त पूर्णपणे हादरले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि मुलाच्या कृतीची गंभीरता समजल्यामुळे ते भावनिकदृष्ट्या खूप खचले, असं मारिया यांनी नमूद केलं आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार १९९३च्या बॉम्बे ब्लास्टमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला आणि १४०० हून अधिक जण जखमी झाले होते. संजय दत्तने बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यापैकी त्याने सुमारे साडेतीन वर्ष तुरुंगवास भोगला. चांगल्या वागणुकीमुळे शिक्षा कमी (remission) झाल्यानंतर त्यांची २०१६ मध्ये तुरुंगातून सुटका करण्यात आली.