नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित व महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या भव्य कलाकृतींपैकी एक आहे. यामध्ये रणबीर कपूर ‘प्रभू श्रीराम’ ही भूमिका साकारणार आहे. अनेकांना या चित्रपटाची भव्यता आवडली असली तरी, काहींनी मात्र यातील व्हिज्युअल्स, व्हीएफएक्स आणि कलाकारांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

रामानंद सागर यांच्या ऐतिहासिक ‘रामायण’ मालिकेत ‘लक्ष्मण’ ही भूमिका साकारणारे सुनील लाहिरी यांनी व्हीएफएक्सवर टीका करणं टाळलं. टीझर ही फक्त एक झलक असते. मात्र प्रभू रामाच्या रूपातील रणबीर कपूरचा लूक त्यांना फारसा पटलेला नाही.

रणबीर कपूरच्या भूमिकेबद्दल सुनील लहरी काय म्हणाले?

‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत लाहिरी म्हणाले, “रणबीर ठीक दिसतोय, पण चेहऱ्यावर निरागसपणा थोडा कमी वाटतोय. अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर जो संयम, शांतता आणि निरागसता होती, ती इथे जाणवत नाही. पण मला खात्री आहे की, रणबीर त्याच्या अभिनयाने या भूमिकेला नक्कीच न्याय देईल.”

Award Banner

अरुण गोविल यांनी साकारलेली प्रभू रामाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, त्यामुळेच रणबीरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप आहेत. ‘ॲनिमल’ सारख्या हिंसक आणि आक्रमक भूमिकेनंतर रणबीर कपूर प्रभू श्रीराम ही शांत आणि संयमी भूमिका प्रभावीपणे साकारू शकेल का? अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यावर सहमती दर्शवत लहरी म्हणाले, “तो थोडा कठोर दिसतोय, रामपेक्षा तो लक्ष्मण किंवा भरत या भूमिकेत जास्त योग्य वाटला असता. श्रीरामांच्या भूमिकेसाठी नेहमीच एखादा नवीन चेहरा निवडणं अधिक चांगलं असतं. खासकरून कोणताही वाद नसलेला नवीन अभिनेता या पात्रासाठी नेहमीच योग्य ठरतो.”

रामायण मालिकेतील इतर कलाकारांच्या संमिश्र प्रतिक्रिया

‘महाभारत’ मालिकेत प्रभू श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज यांना हा टीझर आवडला. ते म्हणाले, “रामायण आता जागतिक रूपात समोर येत आहे. नितेश तिवारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा.”

दुसरीकडे, रामानंद सागर यांच्या रामायणात ‘सीता’ माता साकारणाऱ्या दीपिका चिखलिया या टीझर पाहून भारावून गेल्या आहेत. त्या म्हणाल्या, “मी टीझर पाहिला आणि तो खूपच भव्य आहे. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट खूप चांगला वाटतोय. त्यांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने बनवला आहे. आता मी या चित्रपटाची वाट पाहतेय.”

रामायणमधील कलाकार

रामायणमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम व परशुराम या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. इतर कलाकारांमध्ये रावणच्या भूमिकेत यश, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल आणि लक्ष्मणच्या भूमिकेत रवी दुबे आहेत. काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, अरुण गोविल, कुणाल कपूर, आदिनाथ कोठारे, शीबा चड्ढा आणि इंदिरा कृष्णन यांचाही समावेश आहे.

नमित मल्होत्रा यांनी निर्मिती केलेला ‘रामायण’ हा चित्रपट तब्बल ४,००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केला जात आहे. यामुळे हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल. ‘रामायण: भाग १’ ऑक्टोबर २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, तर चित्रपटाचा दुसरा भाग २०२७ मध्ये येण्याची शक्यता आहे.