Samay Raina & sunil Pal Indias Got Latent Controversy : समय रैना आणि सुनील पाल यांच्यातील वाद संपला असं वाटत होतं. मात्र नुकत्याच आलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. पण हा एपिसोड नेटफ्लिक्सवर आल्यानंतर सुनील पाल यांनी पुन्हा समय रैनावर टीका केली आहे.
सुनील पाल म्हणाले की आयोजकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि समय रैना सारख्या नव्या पिढीतील कॉमेडियनला जास्त महत्त्व दिलं. गेल्या वर्षी झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर समय रैनाने अलीकडेच शोच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली होती. आता त्यावर सुनील पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने त्याच्या शोमध्ये आई-वडिलांना बसवावं – सुनील पाल
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार सुनील पाल हे ‘September 21’ चित्रपटाच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या दुसऱ्या सीझनची घोषणा केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनील पाल म्हणाले, “मला आनंद आहे. त्या शोमध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांना बसवावं, अशी माझी इच्छा आहे.”
सुनील पाल यांना पुढे शोमध्ये पाहुणा म्हणून जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर सुनील पाल म्हणाले, “मी त्या शोमध्ये जाणार नाही. तो खूप मोठा शो आहे आणि मी खूप छोटा कलाकार आहे. पण समय रैनाने हा शो करताना त्याच्या आई-वडिलांना जज (प्रक्षिशक) म्हणून बसवावं, जसं अर्चना पूरण सिंह आणि नवजोत सिंग सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बसतात. त्यांच्या समोर हा शो करावा. तेव्हाच मी मान्य करेन की समयमध्ये खरंच हिंमत आहे.”
सुनील पाल आणि समय रैना यांच्यातील वाद गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झाला. त्या वेळी सुनील पाल यांनी समय रैना आणि यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांना दहशतवादी असं म्हटलं होतं. रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात त्यांच्याविरोधात अनेक एफआयआर देखील दाखल करण्यात आल्या होत्या.
या महिन्याच्या सुरुवातीला ‘वर्लड लाफटर डे’ निमित्त कपिल शर्माने त्याच्या नेटफ्लिक्स शोमध्ये समय रैना आणि सुनील पाल यांना एकत्र आणलं. एपिसोडमध्ये समयने सुनील पाल यांच्यावर हलक्या-फुलक्या शैलीत विनोद केले. त्यानंतर सुनील पाल यांनी कपिल शर्मा आणि समय रैना यांनी मिळून आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला. मला स्टँड-अप परफॉर्मन्ससाठी बोलावलं होतं, पण तसं काही झालंच नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन २ च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोमध्ये आलिया भट्ट, शर्वरी वाघ तिथे उपस्थित असल्याचं दिसलं. मात्र, समय रैना किंवा या अभिनेत्रींकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
