घरातील भांडणं चव्हाट्यावर आणू नये, असं म्हणतात. पण जवळपास दीड वर्षापासून गोविंदा अन् त्याची बायको सुनीता आहुजा अशाच वादांमुळे चर्चेत आहेत. सुनीता आहुजा दर दुसऱ्या दिवसाला नवऱ्यावर नवीन आरोप करतेय. काही वेळा गोविंदा उत्तर देणं टाळतो, पण काही वेळा तो तिने असं बोलू नये, तिचे आरोप खोटे आहेत, असं म्हणतो.
खरं तर तर ९० च्या दशकातील सुपरस्टार, ज्याने आपल्या अभिनयाने, डान्सने प्रेक्षकांना वेड लावलं, ज्याची एक झलक पाहण्यासाठी महिला चाहत्या गर्दी करायच्या, त्या गोविंदाच्या करिअरला दीड दशकापूर्वी उतरती कळा लागली. मधली काही वर्षे पडद्यापासून दूर असलेला गोविंदा फार चर्चेत नसायचा. कधी एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणा म्हणून दिसायचा, तीच काय तर त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असायची. मात्र, अलीकडे तो त्याच्या कामामुळे नाही तर बायकोच्या आरोपांमुळेच चर्चेचा विषय ठरतोय.
गोविंदा व सुनीता आहुजा यांचा ३९ वर्षांचा संसार आहे. त्यांना ३६ वर्षांची लेक आहे, जिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण अपयशी ठरली, आता मुलगा सिनेमात येण्यासाठी धडपडतोय. याचदरम्यान सुनीता मात्र पतीबद्दल नको नको ते बोलतेय. पुढच्या जन्मी हा नवरा नको, त्याचे मराठी अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत, त्याचं वजन वाढलंय, पोट सुटलंय त्यामुळे त्याने व्यायाम करावा, तो चुकीच्या संगतीत आहे, अशा एक नाही तर बऱ्याच गोष्टी सुनीता आहुजा सातत्याने मुलाखतींमध्ये जाहीरपणे बोलतेय. याचदरम्यान तिने स्वतःचं युट्यूब चॅनल तिने सुरू केलंय आणि तिकडेही नवऱ्याचा वाईटपणा दाखवून लाखो व्ह्यूज मिळवतेय.
सुनीता आरोप सातत्याने करत असली तरी तिला त्याच्यापासून घटस्फोट नकोय. सुनीता व तिची मुलं गोविंदाबरोबर राहत नाहीत. एकीकडे पतीबद्दल आरोप करणारी सुनीता गणपती आणि इतर सण मात्र पतीबरोबर साजरे करते आणि तो समोर असताना त्याचं कौतुक करते. त्यामुळे कोणती सुनीता खरी, पतीवर आरोप करणारी की त्याचं कौतुक करणारी? असा प्रश्न पडतो. एकेकाळचा सुपरस्टार असलेल्या गोविंदाच्या करिअरला उतरती कळा लागली आणि पत्नीने घरगुती वाद चव्हाट्यावर आणून त्याचा बाजार मांडलाय, हे पाहून नक्कीच वाईट वाटतं. बालपणी टीव्हीवर ज्याचे सिनेमे पाहून खळखळून हसायचो, त्याला आता काम मिळत नसताना त्याची पत्नी मात्र त्याच्याबद्दल रोज अपमानास्पद बोलताना दिसते.
सुनीता जे आरोप नवऱ्यावर करतेय, ते कदाचित खरे असतीलही, पण त्याबद्दल सोशल मीडियावर बोलल्याने सगळं ठिक होणार आहे, असं अजिबात नाही. आधी कधीतरी मुलाखत देणाऱ्या सुनीताकडे जेवढं आदराने बघितलं जायचं, तशी परिस्थितीही आता उरलेली नाही. काहीच विचार न करताना ही महिला वाट्टेल ते बोलत असते, अशा प्रतिक्रिया आता उमटतात. पतीला यश मिळण्याआधी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलेली सुनीता आता मात्र स्वतः लाइमलाइटमध्ये येण्यासाठी काहीही बोलतेय का? असा प्रश्न मनात येतो.
गोविंदा व सुनीताने जवळपास अख्खं आयुष्य एकत्र काढलंय. खूप कमी वयापासून ते एकत्र आहेत. आता आयुष्याच्या या टप्प्यात एकमेकांशी बोलून वाद सोडवावे आणि आनंदाने राहावं, सोशल मीडियावर सुनीताने गोविंदाचा पाणउतारा करू नये असं मनापासून वाटतं.
