बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याच्या पत्नी सुनीता आहुजा दोघे कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही सोशल मीडियावर चर्चा होत असते. सुनीता या स्वत: स्पष्टवक्त्या स्वभावाच्या असल्याने त्या अनेकदा त्यांच्या पतीबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा इंडस्ट्रीतील कुठल्याही गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलताना दिसतात.
सुनीता आहुजा यांनी कायम त्यांचा पती गोविंदाच्या पाठीशी राहून त्याला साथ दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी त्याचं बरंचसं कामही सांभाळलं. मात्र, गेल्या काही वर्षांत सुनीता यांनी सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी त्यांच्या नेहमीच्या स्पष्टवक्त्या शैलीत सांगितलं की, इतर अनेक अभिनेत्यांप्रमाणे गोविंदाही हेअर पॅच वापरतो. तसेच, यापूर्वी त्यांनी त्यांच्या पतीला ‘GOAT’ (Greatest of All Time) का म्हटलं नव्हतं, याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
मॅशेबल इंडियाशी संवाद साधताना सुनीता आहुजा यांनी या वादाबाबत स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या, “जेव्हा मला GOAT कोण आहे असं विचारलं गेलं, तेव्हा मला या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. मला वाटलं आपण खऱ्या बकऱ्यांबद्दल बोलत आहोत. त्यामुळे मी म्हणाले की, माझे पती बकरा नाहीत. खरं तर, मी त्यांना सिंह म्हणणार होते.”
त्या पुढे म्हणाल्या की, त्यावेळी उपस्थित असलेली शिल्पा शेट्टी सतत गोविंदालाच GOAT म्हणत होती. “जर मला GOATचा अर्थ माहीत असता, तर मी लगेचच ते मान्य केलं असतं. गोविंदा ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ आहे, कारण त्याच्यासारखा दुसरा अभिनेता नाही. मी कधीही माझ्या पतीचा अपमान केलेला नाही आणि तसं करण्याचं कारणही नाही. तो सर्वश्रेष्ठ आहे,” असं सुनीता यांनी स्पष्ट केलं.
गोविंदाच्या केसांबद्दल सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया
सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही मनमोकळेपणाने भाष्य केलं. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “तो आजही खूप छान दिसतो. मात्र, पूर्वी त्याचे नैसर्गिक केस होते. आता तो हेअर पॅच वापरतो.” हे सांगताना त्या हसल्याही. यानंतर त्यांनी लगेचच स्पष्ट केलं, “यात लपवण्यासारखं काय आहे? इंडस्ट्रीत जवळपास सगळेच अभिनेते असं करतात. अभिनेते आणि अभिनेत्री दोघेही केसांसाठी विविध उपचार किंवा उपाय करतात.”
सुनीता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या की, खूप लहान वयात त्यांचं गोविंदाशी लग्न झालं होतं आणि त्या अवघ्या १५ वर्षांच्या असतानाच त्याच्या प्रेमात पडल्या होत्या.
