बॉलीवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटातील सहअभिनेत्रीमुळेही चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता यांनी त्याच्या सहअभिनेत्रीबरोबर फिरण्यावरुन टीका केली होती. सुनीता आहुजा अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, पतीबद्दल व कुटुंबाबद्दल स्पष्टपणे बोलत असतात. अशातच सध्या त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हयारल होत आहे ज्यामध्ये त्या गोविंदाबद्दल बोलातना दिसत आहेत.

गोविंदा व सुनीता आहुजा बॉलीवूडमधील नेहमी चर्चेत राहणाऱ्या जोडींपैकी एक आहेत. गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल पत्नी सुनीता अनेकदा रोखठोक वक्तव्य करत असतात. अशातच आता त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या गोविंदाच्या सहअभिनेत्रींबरोबर काम करण्याबद्दल बोलत आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे त्यांना गोविंदाला इतर स्त्री कलाकारांबरोबर काम करताना पाहून हेवा वाटतो असं म्हटल्याचं दिसतं.

सुनीता यांना वाटायचा हेवा

लेहरेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनीता यांना विचारण्यात आलं की, पती गोविंदा सुपरस्टार झाल्यानंतर अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम करताना पाहून त्यांना कसं वाटायचं? यावर गोविंदाने मध्येच मजेशीरपणे हस्तक्षेप करत, “उलट-सुलट काही विचारू नका!” असं म्हणत हशा पिकवला. त्यानंतर सुनीता यांनीही विचारलेल्या प्रश्नचा उत्तर दिलं. यानंतर सुनीता म्हणालेल्या, “हे त्यांचं काम आहे, मग वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? काम आहे, तर ते करणारच. तुम्ही म्हणत असाल हेवा वाटतो का, तर कोणत्याही स्त्रीला हेवा वाटणारच” असं म्हणत त्या हसल्या. पुढे त्या म्हणाल्या, “पण हे त्यांचं काम आहे, त्यामुळे मी काही बोलत नाही.”

सुनीता आहुजा यांनी नुकतंच गोविंदाला त्याची ‘रूपा’ चित्रपटातील सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारबरोबर फिरल्याने “शुगर डॅडी” म्हटलं होतं. यानंतर या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, आता गोविंदाने या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनीता यांनी सार्वजनिकरित्या गोविंदावर या अभिनेत्रीशी अफेअर असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गोविंदा म्हणाला, “बाहेरून मला जे काम मिळतं, ते मी करत नाही आणि मी जे काम करतोय, त्यात तुम्ही हस्तक्षेप करत आहात आणि जेव्हा तुम्ही तुमचं काम करत होतात, मग तो खाद्यपदार्थांशी संबंधित शो असो किंवा लॉकडाऊनच्या काळातलं काम असो, टीनाला (गोविंदाची मुलगी) सांगून तुम्ही दोन्ही शोमध्ये मला कसंही करून बोलावून घेतलं आणि माझ्याकडून मदत घेतली. असो, तो तुमचा अधिकार आहे.” पुढे गोविंदा म्हणाला, “जेव्हा मी पुन्हा चित्रपटांत काम करायला सुरुवात केली, तेव्हा लोकांच्या मनातून मी उतरावं, माझी बदनामी व्हावी किंवा माझं कामच बंद पडावं, यासाठी तुम्ही पुरेपुर प्रयत्न करत आहात.”