Sunita Ahuja Talks About Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकताच त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता त्यांना त्यांच्या घरी आणण्यात आलं आहे. यादरम्यान अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांना रुग्णालयात पाहण्यासाठी गेले होते.
सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी आणि देओल कुटुंबातील इतर सदस्यही त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसले. अशातच आता अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी पापाराझींशी संवाद साधताना पंजाबी लोक हार मानत नाही असं म्हटलं आहे.
सुनीता आहुजा यांची धर्मेंद्र यांच्याबद्दल प्रतिक्रिया
विरल बयानीने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावेळी सुनीता आहुजा मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर पापाराझींनी त्यांना धर्मेंद्र यांच्याबद्दल विचारलं. यावेळी त्या म्हणाल्या, “गोविंदा गेला होता काल त्यांना भेटायला, मी मुंबईत नव्हते. ते आमच्या कुटुंबाचे सगळ्यात आवडते अभिनेते आहेत. ते ही-मॅन (he man) आहेत. मी प्रार्थना करते की त्यांची प्रकृती लवकर सुधारावी आणि ते आधीसारखे व्हावेत.”
सुनीता याबद्दल पुढे म्हणाल्या, “माझी मनापासून ही इच्छा आहे, माझ्या कानावर चांगलीच बातमी पडू दे, मीसुद्धा त्यांना भेटायला जाईन. होतील ते ठीक.. पंजाबी लोक कधी हार मानत नाही, एकदम फर्स्टक्लास बरे होतील ते.”
धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांची ट्रीटमेंट आता त्यांच्या घरीच होणार आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार डॉक्टर प्रतीत समदानी धर्मेंद्र यांच्याबद्दल म्हणाले, “धर्मेंद्रजींना सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या घरीच त्यांच्यावर उपचार होतील त्यांच्या कुटुंबीयांनीच हा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, अभिनेता गोविंदाचीही प्रकृती बिघडली असून त्याला जुहूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाही धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी रुग्णालयात जाताना दिसला होता.
