Sunita Ahuja Reveals Name Of Woman Govinda Is Allegedly Dating : गोविंदाच्या पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्या चर्चेत असतात. काही दिवसांपासून गोविंदा व सुनीता यांच्या घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या होत्या. गोविंदाचं विवाहबाह्य संबंध असल्याचंही म्हटलं जातं. सुनीता यांनीदेखील याला दुजोरा दिलेला. अशातच आता याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२०२५ हे वर्ष फार वाईट असल्याचं सुनीता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ‘मिस मालिनी’शी संवाद साधताना याबद्दल सुनीता म्हणाल्या, “२०२५ हे वर्ष माझ्यासाठी फार वाईट होतं. मी व माझं कुटुंब आम्ही कठीण काळातून गेलो. गोविंदाबद्दलच्या काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या आणि त्या मला अजिबात आवडत नव्हत्या. प्रत्येक गोष्टीसाठी एक वय असतं आणि वयाच्या ६३ व्या वर्षी मुलं मोठी झालेली असताना असं काहीतरी करणं योग्य नाही.”
सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया
पतीबद्दल सुनीता पुढे म्हणाल्या, “२०२६ मध्ये मी आशा करते की, देव गोविंदाला सदबुद्धी देईल. त्याला कळायला हवं की, कुटुंब हे कुटुंब असतं. ज्यावेळी तुम्ही वाईट परिस्थितीतून जात असता तेव्हा कोणीही तुमच्यामागे उभं राहत नाही. लोकांना फक्त तुमच्याकडे असलेल्या पैशांशी देणं-घेणं आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपतील तेव्हा तेही निघून जातील.”
सुनीता पुढे म्हणाल्या, “लग्नात आपल्या जोडीदारावर विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. एकदा तुम्ही विश्वास गमावला की, मग लग्न फार काळ टिकत नाही. आजकाल तर घटस्फोट फारच सामान्य घटना झाली आहे. माझ्या मते ते चांगलं नाही.” सुनीता यांनी पुढे गोविंदाशी लग्न करण्यापूर्वी त्या श्रीमंत कुटुंबातील होत्या आणि गोविंदा इंडस्ट्रीत त्याची ओळख निर्माण करू पाहत होता. तेव्हा त्याच्याकडे गाडी किंवा घर काहीही नव्हतं. परंतु, तरीसुद्धा त्यांनी गोविंदाची साथ दिली याबद्दलची माहिती दिली आहे.
सुनीता म्हणाल्या, “हल्ली गोष्टी फार बदलल्या आहेत. लोकांचा एकमेकांवर विश्वास नाहीये. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी अनेक जण मेडिकल टेस्टही करतात. मी श्रीमंत कुटुंबातून येते आणि त्यावेळी गोविंदाकडे घर किंवा गाडी नव्हती. तो त्याचं बी.कॉम.चं शिक्षण पूर्ण करत होता. मी कधीच पैशांमागे धावले नाही. जर माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे असते, तर मी माझ्या वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतं; मी गोविंदाशी लग्न केलं नसतं. मी १५ वर्षांची होते जेव्हा मी गोविंदाच्या प्रेमात पडले आणि वडिलांना सांगितलं की, मी गोविंदाशी लग्नं करणार आहे.”
गोविंदा कोमल नावाच्या मुलीला करतोय डेट?
उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना, सुनीता यांनी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला, “तुझं नाव कोमल आहे का? या नावात थोडी गडबड आहे. मला हे नाव अजिबात आवडत नाही. हे नाव बदल. कोमल नावाची मुलगी मला अजिबात आवडत नाही,” असं म्हटलं.
