एकता कपूरचा ‘लॉक अप २’ हा शो अखेर ‘नेटफ्लिक्स इंडिया’वर सुरू झाला आहे. या शोचे सूत्रसंचालन फराह खान आणि रितेश देशमुख करत आहेत. अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील या सीझनमध्ये एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. गेल्या काही काळापासून सुनीता आणि गोविंदा यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत आहे. ते वेगळे झाल्याच्या चर्चा होत आहेत. अशातच सुनीताने लॉक अप शोमध्ये जाण्याचा निर्णय व त्यावर गोविंदाची प्रतिक्रिया याबद्दल खुलासा केला.
स्क्रीनशी बोलताना सुनीता म्हणाली, “मी ‘लॉक अप’ करण्याचा निर्णय घेतला कारण एकता कपूरचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझा मुलगा यशबरोबर एक चित्रपट करत आहे आणि आम्हा दोघांना एकत्र लाँच करत आहे. मी पहिल्यांदाच चित्रपटात यशच्या आईची भूमिका साकारत आहे. मला ‘राईझ अँड फॉल’, ‘द ५०’, ‘ट्रेटर्स’, ‘अलायन्स’ अशा अनेक रियलिटी शोच्या ऑफर्स आल्या होत्या, पण मी ‘लॉक अप’ शो निवडला. कारण मला वाटलं की ‘लॉक अप’मध्ये माझी व्यवस्थित काळजी घेतली जाईल.”
सुनिता पुढे म्हणाली, “कोणी माझ्यावर २४ तास नजर ठेवून असेल, याची मला अजिबात भीती वाटत नाही. मी जशी आहे तशीच राहते. मी जगात कोणासाठीही स्वतःला बदलणार नाही. या शोच्या माध्यमातून लोकांना समजेल की खरी ‘सुनीता आहुजा’ काय आहे. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे फिट आहे आणि मला परिस्थिती कशी हाताळायची हे माहित आहे. मला टास्कची भीती वाटत नाही. मी खोटं बोलत नाही, त्यामुळे मी या शोमध्ये चांगली कामगिरी करेन. बाकी सर्व काही नशिबावरही अवलंबून आहे.”
सुनीता आहुजाच्या निर्णयावर गोविंदाची प्रतिक्रिया
सुनीताने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर गोविंदाची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल सुनीता म्हणाली, “गोविंदा खूप टेन्शनमध्ये होता. तो म्हणाला, ‘मी माझ्या पत्नीला फुलासारखं जपलंय, तिथे आत जर तिला कोणी त्रास दिला तर ती रडायला लागेल.’ माझ्याशी तिथे कोणी चुकीचं वागू नये, याची त्याला खूप काळजी वाटत होती. कोणी मला दुखावू नये किंवा मला रडवू नये, असं त्याला वाटतं. मी हा शो का करतेय, असं तो म्हणत होता. पण त्याला हे माहीत नाही की त्याची पत्नी खूप खंबीर आहे, ती सर्वा सहन करू शकते आणि कुणाशीही लढू शकते.”
सध्या सुनीता व गोविंदाच्या नात्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू आहेत. अशातच आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कोणीही कमेंट केली तर आपण सहन करणार नाही, असं तिने स्पष्ट केलं. सुनीता म्हणाली, “हा काही फॅमिली शो नाही, त्यामुळे माझ्या कुटुंबाबद्दल कोणीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. गोविंदा इंडस्ट्रीत खूप सीनियर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कोणीही काही बोलायला नको, मी त्याची पत्नी आहे, मला जे वाटतं ते मी बोलू शकते, पण तिसऱ्या व्यक्तीला त्याच्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.”
दरम्यान, सुनीता व गोविंदाच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. कारण तिने गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर गोविंदा व सुनीता वेगळे राहतात. अशातच आता सुनीता या शोमध्ये गेल्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणते खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
