Sunita Ahuja on Govinda Komal Rani Relation: बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या वादळ आलंय. गोविंदाचे कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी गोविंदाने कोमलसोबत लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते, त्यानंतर सुनीता यांनी कोलकात्यातील मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. “माझा संसार मोडतोय,” असं म्हणत सुनीता आहुजांनी जेन झी पिढी व महिलांना पाठिंबा मागितलाय.

सुनीता आहुजाने कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात दर्शन घेतले आणि त्याचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की, त्या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील ‘राक्षसांचा’ सर्वनाश व्हावा यासाठी प्रार्थना करायला आल्या होत्या. त्यांनी महिला आणि तरुणांना भावुक आवाहन करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केली.

माझा संसार मोडतोय – सुनीता आहुजा भावुक

सुनिता आहुजा म्हणाल्या की, त्या ज्या देवीच्या दर्शनाला आल्या आहेत ती राक्षसांचा संहार करण्यासाठी ओळखली जाते. “माझ्याही आयुष्यात काही राक्षस आहेत आणि त्यांचा नाश व्हावा, हीच प्रार्थना करण्यासाठी मी माता राणीच्या चरणी आले आहे. ‘जेन झी’ पिढी आणि महिलांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्याबरोबर जे घडतंय ते चुकीचं आहे. माझा संसार मोडतोय.”

गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार केवळ प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करत असल्याचा आरोप सुनिता यांनी केला. “ज्यांना मुली किंवा सुना आहेत त्यांना माझं दुःख नक्कीच समजेल. तुमच्या मुलीबरोबर किंवा सुनेबरोबर असं काही घडलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मला सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे,” असं सुनीता आहुजा म्हणाल्या.

गोविंदा लालबागचा राजाच्या दर्शनाबद्दल काय म्हणाला?

गोविंदाने कोमल राणीबरोबर अफेअर नसल्याचं स्पष्ट केलं. आपल्यात फक्त व्यावसायिक नातं असून आगामी चित्रपट ‘रुपा’च्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी कोमल राणीबरोबर लालबागच्या राजाच्या चरणी गेल्याचं गोविंदाने म्हटलं होतं. तसेच त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्याच्याबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा त्याने केला.

सुनीता आहुजाने केलेला घटस्फोटासाठी अर्ज

दरम्यान, सर्वात आधी डिसेंबर २०२४ मध्ये गोविंदा व सुनीता यांच्यात बिनसल्याचं समोर आलं होतं. सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. नंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये सुनीता व गोविंदा वेगळे राहत असल्याचं अभिनेत्याच्या मॅनेजरने सांगितलं. नंतर ऑगस्टमध्ये सुनीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.