Sunita Ahuja Property Statement: बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असते. सुनीता व गोविंदा यांच्यात मतभेद आहेत, त्यामुळे ती त्याच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी जाहीरपणे बोलत असते. काही दिवसांपूर्वी पती गोविंदाचं मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याचं वक्तव्यही तिने केलं होतं. गोविंदा व सुनीता एकत्र राहत नाहीत. अशातच आता सुनीता आहुजाने तिच्या संपत्तीविषयी विधान केलं आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने गंमतीत सांगितलं की, ती आपली सगळी संपत्ती आपल्या लाडक्या पाळीव श्वानाच्या नावावर करण्याचा विचार करत आहेत. सुनीता मुंबई विमानतळावर आपल्या पाळीव श्वानाबरोबर आली होती, तिथे तिने फोटोग्राफर्सबरोबर संवाद साधला. तिने आपल्या श्वानाला कडेवर घेतलं होतं आणि नंतर त्याला कारच्या पुढच्या सीटवर आरामात बसवलं. श्वानाला पुढच्या सीटवर बसवताना सुनीता म्हणाली, “मी माझी सगळी संपत्ती याच्या नावावर करून देईन.” यावर एका फोटोग्राफरने त्यांचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकबद्दल विचारलं, “मग कृष्णा कुठे जाणार?”

कृष्णा अभिषेकबद्दल सुनिता आहुजाने काय म्हटलं?

सुनीताने म्हटलं की कृष्णाकडे आधीच खूप आहे आणि पुढेही त्याला खूप यश मिळेल. “तो माझा मुलगा आहे. त्याच्याकडे खूप काही आहे. आता मलाच त्याच्याकडून काहीतरी घ्यावं लागेल. कृष्णा माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. देव त्याला आणखी मोठं करो, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तो यशस्वी होत राहील,” असं सुनीता आहुजा म्हणाली.

एप्रिल महिन्यात ‘लाफ्टर शेफ्स फन अनलिमिटेड’ या शोमध्ये सुनीता व तिचा भाचा कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांच्यात मतभेद मिटले. अनेक वर्षांपासून चाललेला कौटुंबिक वाद या शोमध्ये संपला. त्या एपिसोडमध्ये सुनीताला स्टेजवर पाहून कृष्णाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला आणि तो भावुक झाला. त्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेत त्याने मामीची माफी मागितली.

सुनीता आहुजाने कृष्णा मुलासारखा आहे, असं म्हणत त्याला माफ केलं. तसेच तिने सर्वांना आता जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याचं आवाहन केलं. दरम्यान, सुनीता आहुजा, कृष्णा आणि कश्मीरा यांच्यातील हा वाद साधारण १४ वर्षे जुना होता. कृष्णा हा गोविंदाच्या थोरल्या बहिणीचा मुलगा आहे.