Sunjay Kapur Last Photo: अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती, उद्योजक संजय कपूर यांचे गुरुवारी (१२ जून रोजी) लंडनमध्ये निधन झाले. संजय कार्टियर ट्रॉफीसाठी पोलो सेमीफायनल खेळत असताना त्यांनी चुकून मधमाशी गिळली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनानंतर चार दिवसांनी त्यांच्या सुजान इंडिया टायगर्स या पोलो टीमने एक फोटो शेअर केला आहे. हा संजय कपूर यांचा शेवटचा चित्रपट आहे. यात संजयबरोबर टीमचा कॅप्टन जैसल सिंगही आहे.
हा फोटो संजय कपूर यांच्या निधनाआधीचा आहे. पोलोचा शेवटचा सामना दिवंगत संजय कपूर यांना समर्पित केला जाईल आणि अंतिम सामन्यापूर्वी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळले जाईल, अशी माहिती टीमने दिली आहे. तसेच संजय कपूर यांना आदरांजली वाहण्यासाठी टीमचा कॅप्टन अंतिम सामना खेळणार नाही.
फोटो शेअर करून त्यांच्या टीमने लिहिलं, “आज आम्ही आमचे प्रिय मित्र संजय कपूरच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्टियर ट्रॉफीचा अंतिम सामना खेळत आहोत. संजय यांचे काही दिवसांपूर्वी मैदानावर दुःखद निधन झाले. आमचे कॅप्टन जैसल सिंग, त्यांच्या प्रिय जुन्या मित्र संजयच्या सन्मानार्थ एक मिनिट मौन पाळण्यासाठी टीमबरोबर बसतील आणि नंतर आदरांजली वाहण्यासाठी बाहेर बसतील. संजय व जैसल यांचा हा फोटो काही दिवसांपूर्वी सेमीफायनल खेळायला जाण्याच्या काही क्षणाआधी काढला होता.”
“RIP संजय. तुमची उणीव कायम भासेल. तुमचा उत्साह आणि पाठिंबा सर्वांना कायम लक्षात राहील,” असं या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय.
पाहा पोस्ट-
कोण होते संजय कपूर?
संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे चेअरमन होते. त्यांची तब्बल १०,३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. वडील सुरिंदर कपूर यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर संजय यांनी कंपनीची धुरा सांभाळली. १२ जून रोजी पोलो मॅच खेळताना चुकून त्यांनी मधमाशी गिळली. ती मधमाशी घशात अडकल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवर कोसळले. त्यांनी रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.
संजय कपूर यांनी २००३ मध्ये करिश्मा कपूरशी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला. या जोडप्याला समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. करिश्माआधी संजय कपूर यांनी फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी लग्न केलं होतं, घटस्फोटानंतर त्यांनी प्रिया सचदेवशी लग्नगाठ बांधली. प्रियापासून त्यांना एक मुलगा आहे. संजय कपूर यांची शेवटची पोस्ट अहमदाबादमधील विमान दुर्घटनेसंदर्भात होती.