Sunny Deol on why he torn Jeans: फर्ज, गदर एक प्रेमकथा, जानी दुश्मन, इंडियन, कसम, जोर, कहर, जीत, इज्जत की रोटी, अपने अशा अनेक सिनेमांतून सनी देओलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सनी देओल आजही नवनवीन भूमिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. विविध मुलाखतींतील त्यांच्या वक्तव्यांचीदेखील चर्चा होताना दिसते. आता सनी देओलच्या एका वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
“मला खूप राग…”
सनी देओलने इंडिया टीव्ही आप की अदालत या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला त्याच्या रागाबद्दल विचारले होते. सनी देओल म्हणालेला, “मला खूप राग येतो. त्यामुळे मी हा प्रयत्न करतो की, मी कोणत्या अशा परिस्थितीमध्ये अडकू नये की, जिथे माझे माझ्या रागावर नियंत्रण राहणार नाही. माझ्याबरोबर अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत.”
खऱ्या आयुष्यात कोणाला मारले आहे का? त्यावर सनी देओल म्हणाला, “जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा खूप वेळा भांडणं झाली आहेत. तो काळच तसा होता. ७० च्या दशकात गँग असायच्या, भांडणं व्हायची. कोणी कोणाकडे बघत असेल, तरी भांडणं व्हायची. पण, मी नशीबवान आहे की, कधी दुखापत झाली नाही. डर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी रागात जीन्स फाडली होती.”
आणखी एका मुलाखतीत सनी देओलने डर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. तो म्हणालेला, “डर सिनेमातील एक सीन ज्या पद्धतीनं शूट केला जात होता, तो मला समजत नव्हतं. मी यशजींना लहानपणापासून माझ्या वडिलांबरोबर पाहिलं होतं. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. त्या आदरामुळे मी त्यांना सांगू शकत नव्हतो की, ते ज्या पद्धतीनं त्या सीनचं शूटिंग करीत आहेत, ते मला समजत नाही. त्या सीनमध्ये मी त्यांना का हवा आहे, हे मी त्यांना विचारू शकत नव्हतो. मला खूप राग आला होता. मी माझ्या खिशात हात घातले. मी यशजींबरोबर बोलायलो गेलो. पण, मला इतका राग आला होता की, त्या रागात मी जीन्स फाडली. मी त्यांना जे बोलायचो होतो, ते बोललो; पण मला माहीत नव्हतं की, रागात जीन्स फा़टेल. माणसाला रागाचा अंदाज नसतो. नंतर समजतं की, रागात कोणत्या गोष्टी घडल्या.”
तो असेही म्हणाला होता, “मी यशजींबरोबर पुन्हा काम करणार नाही. ते त्यांचा दिलेला शब्द पाळत नाहीत. त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगल्या आठवणी नाहीत.”
फिटनेसबद्दल सनी देओल म्हणाला, “आजकाल लोक सप्लिमेंट्स मोठ्या प्रमाणात घेत आहेत. मी सगळ्या तरुणांना सांगू इच्छितो की, मी फिट आहे; पण मी या सगळ्या गोष्टी करत नाही. आजकाल सगळ्या गोष्टींची फॅशन झाली आहे. कोणी सांगेल की, आज अमुक प्रकारचं जेवण जेवलं पाहिजे, कोणी सांगेल की, वेगळ्या प्रकारचं जेवण जेवलं पाहिजे. अमुक प्रकारचा व्यायाम केला, तर असं होईल; पण हे सगळं नुकसान करणारं आहे.”
