Sunny Deol Angry Reaction : बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी ( १२ नोव्हेंबर ) सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. इथून पुढे राहत्या घरी त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील, हा निर्णय देओल कुटुंबीयांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरवण्यात आल्या होत्या. वडिलांच्या निधनाची अफवा पसरल्यावर त्यांची मुलगी ईशा देओल व पत्नी हेमा मालिनी या दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता.

आता धर्मेंद्र व देओल कुटुंबीयांचा आणखी एक पर्सनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेता सनी देओलने पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे. सध्या पापाराझी मीडिया धर्मेंद्र यांच्या घराबाहेरच आहे. सनी देओल गुरुवारी सकाळी पापाराझींना घराबाहेर पाहताच संतापला. घरातील पर्सनल व्हिडीओ सर्वत्र व्हायरल केल्यामुळे त्याने पापाराझींना “तुम्हाला लाज वाटत नाही का?” असा सवाल केला.

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरी सुद्धा आई-वडील आहेत, मुलं आहेत. अजूनही XXXX सारखे व्हिडीओ शूट करत आहेत…खरंच तुम्हाला लाज नाहीये का?” असा सवाल संतापलेल्या सनी देओलने पापाराझींना विचारला.

सनी देओलचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुद्धा “याची खरंच गरज होती”, “अतिशय योग्य केलं…” असं म्हणत सनी देओलला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देओल कुटुंबीयांनी प्रायव्हसीचा आदर करून खोट्या बातम्या पसरवू नका अशी विनंती सर्वांना केली आहे.