Sunny Deol Upcoming Films : अभिनेता सनी देओल सध्या ‘बॉर्डर २’मुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. अशातच आता सनी देओलने त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे.
सनी देओलने ‘बॉर्डर २’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याच्यासह या चित्रपटात दिलजीत दोसांझ, वरुण धवन, अहान शेट्टी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले. अशातच सनी देओलने ‘एबीपी’च्या वृत्तानुसार सनी देओलने त्याच्या आगामी चित्रपटांची घोषणा केली आहे.
सनी देओलने केली आगामी चित्रपटांची घोषणा
सनी देओलने येत्या काळात लवकरच त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अभिनेता म्हणाला, “सध्या माझ्याकडे दोन चित्रपट आहेत. एक ‘लाहौर १९४७’ आणि दुसरा ‘गबरू.’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.” ‘गबरू’ चित्रपटाबद्दल सनी देओल म्हणाला, “गबरू हा चित्रपट खूप छान आहे, माझ्या खूप जवळचा आहे. तो चित्रपट कदाचित फार चालेल की नाही माहीत नाही, पण मला चित्रपट खूप आवडला आहे.”
‘गबरू’ चित्रपटातील भूमिकेबद्दल सनी देओल म्हणाला, “छोट्या शहरात राहणारे बरेच लोक मोठ्या शहरात जाऊन काहीतरी बनण्याचं स्वप्न पाहतात, ही गोष्ट तशीच आहे. मग शहरात तो कसा अडकतो, काय करायला आलो होतो आणि काय करतोय असं त्याला वाटतं, त्यामुळे तो गावीसुद्धा जाऊ शकत नसतो.”
सनी देओलकडे सध्या बरेच चित्रपट आहेत. ‘गबरू’ आणि ‘लाहौर १९४७’ या चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही चित्रपट आहेत. सनी देओलकडे ‘इक्का’, ‘रामायण पार्ट १’ आणि ‘रामायण पार्ट २’ असे चित्रपट आहेत, त्यामुळे येत्या काळात अभिनेता विविध भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘रामायण’मध्ये तो हनुमाच्या भूमिकेतून झळकणार आहे.
