Sunny Deol Batwara 1947 Review Hema Malini : ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून यामध्ये सनी देओलसह प्रीती झिंटाने मुख्य भूमिका साकारली आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चित्रपटाचं अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांनी कौतुक केलं आहे.
‘बटवारा १९४७’ या सिनेमावर हेमा मालिनी यांनी वक्तव्य केलं आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सिनेमातून माणुसकी व एकतेचा चांगला संदेश देण्यात आल्याचे म्हणत ‘बटवारा १९४७’ चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हेमा मालिनी यांनी सावत्र मुलगा सनी देओलच्या अभिनयाचा विशेष उल्लेख केला आहे.
‘बटवारा १९४७’ सिनेमाबद्दल काय म्हणाल्या हेमा मालिनी?
हेमा मालिनी यांनी लिहिलं, “मी काल ‘बटवारा’ हा चित्रपट पाहिला. हा खरोखरच अप्रतिम सिनेमा असून ज्या गोष्टींची सध्या आपल्या देशाला गरज आहे, त्या स्पष्टपणे मांडण्यात आल्या आहेत. एकमेकांबद्दल द्वेषाची भावना असण्यापेक्षा प्रेम, आदर, माणुसकी आणि सलोखा खूप महत्त्वाचे असल्याची आठवण या सिनेमाने करून दिली. या सुंदर संदेशामुळे लोकांना आपला दृष्टिकोन बदलण्याची आणि द्वेषाऐवजी माणुसकीची निवड करण्याची प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे.”
पुढे त्यांनी लिहिलं, “राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन अप्रतिम असून, सनी देओल आणि शबाना आझमी यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. चित्रपटातील करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आजच्या काळात खरोखरच अत्यंत महत्त्वाचा असलेला संदेश देणाऱ्या या अशा चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आमिर खानचं अभिनंदन.”
I watched the movie “Batwara” yday. Simply brilliant with a clear message that conveys what the nation needs today.
— Hema Malini (@dreamgirlhema) August 17, 2026
It reminds us that humanity, mutual respect, and harmony are far more important than hatred and division. I hope this beautiful message inspires people to change… pic.twitter.com/vR12C4ObjA
दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं होतं. दोघांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं. त्यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता ही चार मुलं आहेत.
