Esha Deol Support’s Sunny Deol’s Border 2 : सनी देओलच्य ‘बॉर्डर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती आणि आता तो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला स्वाभाविकपणे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण, कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करीत आहेत. अशातच ईशा देओलनंसुद्धा तिच्या भावाच्या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यानंतर देओल कुटुंबीयांमध्ये वाद आहे. तसेच सनी व बॉबी देओल आणि हेमा मालिनी असे दोन्ही कुटुंबीय वेगवेगळे असतात, अशा चर्चा त्यावेळी सुरू होत्या. पण अशातच आता ‘बॉर्डर २’च्या प्रीमियरला सनी देओलच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या दोन्ही सावत्र बहि‍णींनी हजेरी लावलेली. या तिघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. अशातच आता तिनं याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे.

ईशानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत “बाबांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि ‘बॉर्डर २’ हा चित्रपटही आम्ही एकत्र पाहिला. तुम्ही सगळेसुद्धा सहकुटुंब आणि मित्रमंडळींसह हा चित्रपट बघायला नक्की जा,” असं म्हटलं आहे. पुढे तिनं सनी देओल टॅग करीत “तू खूप कमाल आहेस”, असंही म्हटलं आहे. पुढे तिनं अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, वरुण धवन यांनाही टॅग करीत त्यांचं कौतुक केलं आहे.

धर्मेंद यांना २५ जानेवारी रोजी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्तानं ईशानं पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला. सनी, बॉबी, ईशा व अहाना देओल यापूर्वीसुद्धा काही वेळा एकत्र स्पॉट झाले आहेत.

दरम्यान, सध्या ‘बॉर्डर २’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सुरुवातीच्या दिवसांतच या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. पहिल्या दिवशी सॅकनिल्कच्या वृत्तानुसार या चित्रपटानं ३० कोटी, दुसऱ्या दिवशी ३६ कोटी, तर आतापर्यंत या चित्रपटानं १५८.६१ कोटी इतकी कमाई केली आहे. दुसरीकडे हा चित्रपट भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारित असल्यानं त्याला गल्फ देशांमध्ये बंदी आहे.