Border 2 OTT Release Date : नवीन वर्षात प्रेक्षकांना मोठ्या पड्यावर विविध युद्धपट पाहायला मिळाले. त्यात रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा, अगस्त्य नंदाच्या ‘इक्कीस’चा आणि सनी देओलच्या ‘बॉर्डर २’चा समावेश आहे. या तिन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.
‘धुरंधर’ने तर बॉक्स ऑफिसवर जणू धुमाकूळच घातला. अशातच आता ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर’नंतर सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘इक्की’सही ओटीटीवर आला आहे. खरंतर या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सनी देओलच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.
कमावले ‘इतके’ कोटी
‘बॉर्डर २’ने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेते यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. २३ जानेवारी २०२६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार ४४९.५९ कोटींचा गल्ला जमावला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
कधी व कुठे पाहायचा ‘बॉर्डर २’?
चित्रपटगृहात जाऊन जे सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा सिनेमा पाहू शकले नाही, त्यांना आता घरबसल्या हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ यांचा हा सिनेमा ‘एबीपी’च्या वृत्तानुसार २० मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तुम्ही घरबसल्या नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.
‘बॉर्डर २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन
२३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३० कोटींची कमाई केली होती, तर चित्रपटगृहात सिनेमा रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २२५ कोटींचा गल्ला जमावला; तर सर्वत्र चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या आठवड्यातच या चित्रपटाने बजेटची कमाई वसूल केली. तिसऱ्या आठवड्यात ३०० कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटाचं बजेट २७५ इतकं होतं.
१९९७ मध्ये आलेला चित्रपटाचा पहिला भाग
१९९७ मध्ये ‘बॉर्डर २’ या चित्रपटाचा पहिला भाग ‘बॉर्डर’ प्रदर्शित झालेला. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेला. महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षे लोकांच्या मनात चित्रपटाने व यातील गाण्यांनी घर केलं होतं. दोन दशकांहून अधिक काळानंतर या चित्रपटाचा सीक्वल प्रदर्शित झाला. दुसऱ्या भागात अनेक नवीन चेहरे पाहायला मिळाले.
