Sunny Deol Health Revelation : सनी देओल सध्या त्याच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. सनी देओलने यापूर्वीसुद्धा अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा चाहातावर्ग खूप मोठा आहे. परंतु, तुम्हाला माहीत आहे का प्रेक्षकांची आपल्या कामातून मनं जिंकणाऱ्या सनी देओलला लहानपणी कमी लेखलं जायचं आणि त्याला एक आजारही होता.

बॉलीवूड अभिनेता सनी देओलला एक असा आजार होता, ज्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत त्याच्याबद्दल काही गैरसमज निर्माण झाले होते. अभिनेत्याला लोक बुद्धू समजायचे. सनी देओलने स्वत: एका मुलाखतीत त्याला असलेल्या आजाराबद्दल आणि त्यामुळे आलेल्या समस्यांमुळे कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. सनी देओल नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

सनी देओलला होता ‘हा’ आजार

काही दिवसांपूर्वी ‘बॉम्बे टाइम्स’शी संवाद साधताना सनी देओलने त्याला असलेल्या आजाराबद्दल सांगितलेलं. सनी देओल म्हणालेला की त्याला डिस्लेक्सिया नावाचा आजार होता आणि बराच काळ तो त्याचा सामना करत होता. शाळेत असताना त्याला हा आजार झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. यासह फिल्मच्या सेटवरही त्याला यामुळे खूप त्रास व्हायचा. संवाद पाठ करताना, डायलॉग म्हणताना त्याला अडचणी यायच्या. डिस्लेक्सिया आजारामुळे त्याला स्क्रीप्ट वाचतानाही त्रास व्हायचा आणि लिहितानाही त्रास व्हायचा.

सनी देओलने याबद्दल पुढे सांगितलं की, सेटवर शूटिंग करताना जेव्हा तो या त्रासातून जात होता, तेव्हा तो हिंदी संवाद मागवून घ्यायचा आणि अनेकदा शब्दांची रीहर्सल करायचा. परंतु, यामुळे काही लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे. काही लोक त्याला बुद्धू समजायचे असंही त्याने म्हटलं आहे.

डिस्लेक्सियासारखा आजार असतानाही सनी देओलने मेहनत करून आणि स्वत:वर काम करून इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सनी देओलने आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या ‘बॉर्डर २’मुळे तो चर्चेत असताना, चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बॉर्डर २’नंतर सनी देओलचा ‘गबरू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याने या चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे. सनी देओलचा आगामी चित्रपट माध्यमांच्या वृत्तानुसार ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, सनी देओलच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर २३ जानेवारी २०२६ मध्ये त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी हे लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहेत.