Sunny Deol Fitness Routine : सनी देओल बटवारा १९४७ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ६८ व्या वर्षी मुलगा करण देओलबरोबर ॲक्शन हिरो म्हणून पडद्यावर उतरणाऱ्या सनी देओलला वाढत्या वयातील भूमिकांवरून बऱ्याचदा ट्रोल केले जाते. दिवंगत वडील धर्मेंद्र यांनी ६० आणि ७० च्या दशकात प्रौढ भूमिका साकारण्यास सुरुवात केली होती, मग सनी आजही तरुण हिरोची भूमिका का करत आहे? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्याचबरोबर सनी देओलच्या फिटनेसचे सिक्रेट काय आहे, असंही चाहते विचारतात. या सगळ्या गोष्टींवर सनी देओलनेच प्रतिक्रिया दिली आहे.
‘सवेरा स्टार टॉक्स’शी बोलताना सनीला विचारण्यात आलं की, ६० वर्षांच्या वयात त्याच्या आणि त्याचे वडील धर्मेंद्र यांच्या भूमिकांमधील फरकाबद्दल त्याला काय वाटतं? यावर तो म्हणाला, “मला माझ्या वयाची कधी जाणीवच झाली नाही. ज्या दिवशी मला आतून वाटेल की मी म्हातारा झालोय, त्या दिवशी मी अशा भूमिका करणं सोडून देईन. मला वाटतं की मी आजही तोच तरुण हिरो आहे. मी आधी जे करत होतो तेच आजही करत आहे.”
रोज सकाळी ५.३० ला उठतो सनी देओल
सनी देओल फिटनेसबद्दल म्हणाला, “मला नेहमीच सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. मी सूर्योदयापूर्वी, सकाळी ५:३० वाजता उठतो. ही सवय असल्याने मी आपोआप उठतो. सकाळी उठल्यानंतर मी व्यायाम करतो, कारण यामुळे दिवसभरासाठी शरीरातील एड्रेनल सकारात्मक राहते. मी स्वतःच कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग दोन्ही व्यायाम करतो.”
सामोसे आणि तूप खातो सनी देओल
सनी पुढे म्हणाला, “मला खूप पिळदार बॉडी बनवायची नाही किंवा दुसऱ्या कोणासारखं दिसायचं नाही. मी फक्त १-२ तास व्यायामाचा आनंद घेतो आणि तंदुरुस्त राहतो. माझ्या दिवसाची सुरुवात अशी होते. मी डाएट करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मी सामोसे आणि तूप लावून पराठे खाल्लेच. मी अनेकदा माझ्या मुलांचा आहार पाहतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या वयात आम्ही खूप खायचो.”
‘बटवारा १९४७’ चं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलंय. तर आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणी आणि पंजाबच्या विभाजनादरम्यानच्या लाहोरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी, अली फझल, अभिमन्यू सिंग, खुशी हजारे आणि कनिष्का कपूर मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटातून प्रीती झिंटा ८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
