Aishwarya Rai Was The First Choice For Gadar : ‘गदर’ हा बॉलीवूडमधील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. सनी देओल व अमीषा पटेल यांची यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रचंड गाजली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला. परंतु, तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटासाठी अमीषा पटेल हिला पहिली पसंती नव्हती.

‘गदर : एक प्रेम कहाणी’ हा चित्रपट सनी देओलच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात भारताच्या फाळणीदरम्यानचा काळ दाखवण्यात आला आहे. हा एक भावनिक चित्रपटही आहे. त्यातील तारा सिंग व सकीना यांची प्रेमकहाणी अनेकांना भावली होती. सनी देओलने तारा सिंग तर अमीषा पटेलने सकीना ही भूमिका साकारलेली. दोघांच्याही अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालेलं.

ऐश्वर्या राय व काजोलला झालेली विचारणा

सनी देओलच्या गाजलेल्या ‘गदर’ या चित्रपटात अमीषा पटेलनं साकारलेल्या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी तिच्याआधी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीला पसंती होती. २०२३ मध्ये बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ऐश्वर्या राय आणि काजोल या दोन अभिनेत्रींना विचारणा केलेली याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी दोघीही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या.

यामुळे अमीषा पटेलची झाली निवड

अनिल शर्मा यांनी पुढे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींना विचारणा केली होती. परंतु, व्यग्र वेळापत्रक आणि तारखांच्या समस्यांमुळे त्यांना यामध्ये इच्छा असतानाही काम करता आलं नाही, असं सांगितलं. अमीषा त्यावेळी इंडस्ट्रीत तशी नवीन होती. परंतु, करिअरच्या सुरुवातीलाच तिनं ‘कहो ना प्यार है’, ‘गदर’ यांनसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. ‘गदर’नं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

सनी देओल व अमीषा पटेल यांच्यासह चित्रपटात दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांनी यामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका साकारत त्यांच्या अभिनयानं आणि संवादानं अनेकांच्या मनावर छाप सोडली. आजही त्यांचं या चित्रपटातील पात्र अनेकांच्या लक्षात आहे.

२०२३ मध्ये तब्बल दोन दशकांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘गदर २’ प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी याही चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केली आणि जगभरात जवळपास ६०० कोटींचं कलेक्शन केलं.

दरम्यान, सनी देओल व अमीषा पटेल दोघेही बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. सनी देओल सध्या त्याच्या ‘बॉर्डर २’मुळे चर्चेत आहे. अभिनेत्याच्या या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.