Sunny Deol Shah Rukh Khan Darr Fight: बॉलीवूडचे दोन दिग्गज स्टार्स सनी देओल आणि शाहरूख खान यांच्यातील ‘डर’ (१९९३) चित्रपटादरम्यान झालेला वाद चित्रपटसृष्टीत चांगलाच गाजला होता. या वादानंतर दोन्ही कलाकारांमध्ये तब्बल १६ वर्षे अबोला होता. आता सनी देओलने पुन्हा एकदा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कलाकारांमधील असुरक्षिततेच्या भावनेमुळे सेटवर अस्वस्थतेचं वातावरण तयार होतं, असं मत त्याने मांडलं.
शुभांकर मिश्राशी बोलताना सनी देओल म्हणाला, “मी दुसऱ्या कोणावरही रागावलो नव्हतो. मी स्वतःवरच रागावलो होतो आणि रागाच्या भरात माझी जीन्स फाडली होती. तरुण असताना तुमच्या मनात काही गोष्टी असतात. माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नसते, सेटवरही मला तसं काहीच वाटत नाही. पण बऱ्याच कलाकारांमध्ये असुरक्षितेची भावना असते आणि ते गरज नसलेल्या काही गोष्टी करत असतात. कारण आपण फक्त तीच भूमिका साकारू शकतो जी आपल्याला मिळाली आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही. पण तरीही बऱ्याच कलाकारांना खूप असुरक्षित वाटतं. यामुळे सेटवरील वातावरण बिघडतं आणि चुकीच्या गोष्टी घडतात.”
शाहरूख खानबरोबर मैत्री आहे का? असं विचारल्यावर सनी देओल म्हणाला, “आम्ही तेव्हाही एकमेकांचे शत्रू नव्हतो. मित्र म्हणाल तर, आपण सगळे फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकार आहोत. फिल्म इंडस्ट्रीत सगळेच एकमेकांचे मित्र असण्यापेक्षा सहकलाकार आहोत.”
‘डर’ चित्रपटाचा वाद नेमका काय?
डर चित्रपटात सनी देओलने सुनील नावाची मुख्य हिरोची भूमिका केली होती. तो नौदल अधिकारी असतो. तर शाहरुख खानने राहुल नावाची व्हिलनची भूमिका केली होती. शूटिंगदरम्यान, सनी देओलचा दिग्दर्शक यश चोप्रा यांच्याशी वाद झाला होता. चित्रपटातील एका दृश्यात राहुल सुनीलला चाकू भोसकतो, या दृश्याला सनीचा विरोध होता. एका उच्च प्रशिक्षित कमांडोच्या बाबतीत असा सीन दाखवणं तार्किकदृष्ट्या चुकीचं आहे, असं सनीचं म्हणणं होतं. वादादरम्यान सनीला खूप राग आला आणि त्याने पॅन्टच्या खिशात हात घालून स्वतःचीच जीन्स फाडली होती. त्याचबरोबर, कथेत शाहरूखच्या नकारात्मक आणि माथेफिरू पात्राला ज्या प्रकारे सहानुभूती दिली जात होती, तेही सनीला आवडलं नव्हतं.
या प्रसंगानंतर सनी देओलने पुन्हा यश चोप्रा यांच्याबरोबर कधीच काम न करण्याची शपथ घेतली होती. “मी यश चोप्रांबरोबर पुन्हा कधीच काम करणार नाही. ते शब्दाचे पक्के नाहीत. त्यांच्याबद्दल माझ्या आठवणी चांगल्या नाहीत, त्यांनी माझा विश्वासघात केला,” असं सनी देओलने म्हटलं होतं.
…अन् सनी आणि शाहरूखमधील दुरावा संपला
ऑगस्ट २०२३ मध्ये ‘गदर २’च्या यशानंतर शाहरूख खानने सनीला फोन करून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यातील अनेक वर्षांचा अबोला व दुरावा मिटला. ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शाहरूखबरोबरच्या समेटाबद्दल सनीने सांगितलं होतं. “शाहरूखने चित्रपट पाहण्याआधीच मला फोन करून शुभेच्छा दिल्या. तो खूप खूश होता आणि मला म्हणाला, ‘मला खूप आनंद झाला आहे, तू खरोखरच या यशाचा हकदार आहेस.’ मी त्याचे आभार मानले. त्यानंतर मी त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान यांच्याशीही बोललो. शाहरूख म्हणाला की आज रात्री आम्ही हा चित्रपट पाहणार आहोत,” असं सनी देओलने सांगितलं होतं.
