सनी देओल आणि अक्षय खन्ना दोघेही बॉलीवूडमधील असे अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच पण, त्यांच्या स्वभावाचही अनेक जण कौतुक करत असतात. मनोरंजन विश्वात जिथे कलाकार प्रकाशझोतात राहणं पसंत करतात तिथे हे दोघे नेहमी फक्त कामाच्या निमित्तानेच माध्यमांशी किंवा प्रेक्षकांशी संबंध साधतात. दोघेही खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिक ठिकाणी फार बोलत नाही. अलीकडेच दोघे त्यांच्या ‘धुरंधर’ आणि ‘बॉर्डर २’ या चित्रपटांमुळे चर्चेत होते. अशातच आता हे दोन दमदार अभिनेते एकाच कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सनी देओल लवकरच ‘इक्का’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सनी देओलबरोबर अक्षय खन्नाचीही महत्त्वाची भूमिका आहे. ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ सारख्या बिग बजेट आणि सुपरहिट चित्रपटातून सगळ्यांचं लक्ष वेधल्यानंतर आता अक्षय खन्ना या नवीन कलाकृतीतून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सनी देओलने केलं अक्षय खन्नाचं कौतुक

अशातच नुकतंच ‘इक्का’ या नवीन चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सनी देओलने अक्षय खन्नाचं मनापासून कौतुक केलं. तो म्हणाला, “अक्षय खन्नाला आज जे यश मिळत आहे, ते त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर मिळवलं आहे आणि तो त्या यशाचा खरा हक्कदार आहे.” सनी देओलने अक्षय खन्नाबद्दल बोलताना सांगितलं, “मी आणि अक्षयने याआधी बॉर्डर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तो आमचा पहिला चित्रपट होता. त्यावेळी आम्ही खूप मजा केली होती आणि इक्काच्या शूटिंगदरम्यानही तितकीच मजा आली.” तो पुढे म्हणाले, “मी अक्षयला अनेक वर्षांपासून ओळखतो. तो माझ्यापेक्षाही जास्त अबोल स्वभावाचा आहे, पण तो खूप चांगला माणूस आहे.”

सनी देओलने पुढे अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या यशाबद्दलही भाष्य केलं. तो म्हणाला, “प्रत्येकाची वेळ कधी येईल, हे कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे फक्त काम करत राहायचं, कधीही आशा सोडायची नाही. अक्षयनेही तेच केलं. आज तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तो या यशाचा पूर्णपणे हक्कदार आहे आणि त्याला याहूनही अधिक यश मिळायला हवं. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे”.

सनी देओल पुढे म्हणाला, “बॉर्डरच्या वेळी आमच्यात खूप चांगलं नातं तयार झालं होतं. अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटलो, तरीही तीच आपुलकी आणि जुने दिवस आठवले. अक्षय खूप प्रेमळ स्वभावाचा माणूस आहे. मी अक्षयच्या चेहऱ्यावर कधीच हसू पाहिलं नव्हतं. एकदा शूटिंग संपवून मी निघत होतो, तेव्हा तो माझ्याकडे हसत-हसत येताना दिसला. मीही हसलो. पण लगेच त्याने तिलोत्तमाला हाक मारली. त्या क्षणी तो इतका वेगळा दिसत होता की, मी तर त्याला ओळखूच शकलो नाही.”