ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला ४ महिने झाले आहेत. धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देओल कुटुंबीय या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. या कठीण काळात धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आणि सनी-बॉबीच्या आई प्रकाश कौर यांचा एक भावनिक फोटो समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सनी देओलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर आई प्रकाश कौर यांच्याबरोबरचा एक अत्यंत हृदयस्पर्शी फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना सनीने कोणतेही मोठे वाक्य न लिहिता केवळ एक शब्द व काही इमोजी वापरले आहेत.
सनी देओलने ‘मां’ असं लिहून रेड हार्ट इमोजी कॅप्शनमध्ये दिले आहेत. सनीने शेअर केलेल्या या फोटोवर धाकटा भाऊ बॉबी देओल यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बॉबीने या पोस्टवर अनेक लाल रंगाचे हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. या कमेंटमधून दोन्ही भावांचे आपल्या आईवर असलेले प्रेम आणि या कठीण प्रसंगात ते एकमेकांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे आहेत, हे दिसून येतंय.
पाहा सनी देओलने शेअर केलेला फोटो
सनी देओल व प्रकाश कौर यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर प्रकाश कौर यांचा हा पहिलाच फोटो सार्वजनिकरीत्या समोर आला आहे. प्रकाश कौर या नेहमीच प्रसिद्धीझोतातून दूर राहणं पसंत करतात. मात्र, धर्मेंद्र यांच्या जाण्याने त्यांना झालेला धक्का आणि त्यांचे दुःख या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. त्यांना सनी, बॉबी, विजेता आणि अजेता ही चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांनी नंतर हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले होते. पण सनी आणि बॉबी नेहमीच आपल्या आई प्रकाश कौर यांच्या अत्यंत जवळ राहिले आहेत. सनी देओल अजूनही आईबरोबर एकाच घरात राहतो.
दुसरीकडे, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या पतीच्या आठवणीत अनेक जुने फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर त्या खासदार असल्याने अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना त्या हजेरी लावतात, तेथील त्यांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात.
