Border 2 Box Office Collection : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ व अहान शेट्टी यांचा चित्रपट ‘बॉर्डर २’ बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंगसह प्रदर्शित झाला. प्रजासत्ताक दिनी चित्रपटाने भारतात एका दिवसात सर्वाधिक ५९ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर कमाईत थोडी घट झाली; मात्र दुसऱ्या आठवड्यातील रविवारी (१० वा दिवस) कमाईत पुन्हा वाढ दिसून आली.
Sacnilk नुसार, रविवारी चित्रपटाने २२.५० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत भारतात चित्रपटाची एकूण नेट (सर्व कपात वजा केल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम) कमाई २७७ कोटी रुपये झाली असून, ग्रॉस कमाई (कोणतीही कपात करण्यापूर्वीची एकूण कमाई) ३३० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. जगभरात ‘बॉर्डर २’ने ३६७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या नऊ दिवसांत भारतात २७७.६७ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती.
रविवारी भारतभर ४,३९५ शोमध्ये चित्रपटाची सरासरी प्रेक्षक उपस्थिती ३६.६४ टक्के होती. जयपूरमध्ये सर्वाधिक ६१ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर चेन्नईत ४३ टक्के, दिल्ली-एनसीआरमध्ये ३९.५ टक्के, तर मुंबईत ३१ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, ‘बॉर्डर २’ हा वरुण धवनचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याने कमाईच्या बाबतीत ‘दिलवाले’ला मागे टाकले आहे. तसेच ‘गुड न्यूज’, ‘क्रू’ आणि ‘उडता पंजाब’ला मागे टाकत हा दिलजीत दोसांझचाही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
दरम्यान, ३० जानेवारीला राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ‘मर्दानी’ सिनेमाचे याआधीचे दोन भाग हिट ठरल्याने तिसऱ्या भागाकडून अपेक्षा होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवरील आकडे पाहता, ‘बॉर्डर २’समोर ‘मर्दानी ३’चे कमाईचे आकडे पडताना दिसत आहेत.
Sacnilk च्या प्राथमिक आकडेवारीनुसार, ‘मर्दानी ३’ने पहिल्या दिवशी चार कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ही कमाई ६.२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटाने ७.२५ कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली असली तरीही चित्रपट फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. आतापर्यंत तीन दिवसांत ‘मर्दानी ३’ने एकूण १.५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

