Rajesh Khanna abused Tej Sapru : बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये पसंती मिळवली होती. पण, राजेश खन्ना हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि कलाकारांना दिलेल्या वागणुकीमुळे चर्चेमध्ये राहिले आहेत. अनेक कलाकारांनी काकाजींसह काम करण्याचा अनुभव शेअर केले आहे. आता बॉलीवूडमधील एका अभिनेत्याला त्यांनी शूटिंगवेळी शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. अभिनेते तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर काश्मीरमध्ये शूट करताना घडलेला प्रसंग सांगितला. यामुळे त्यांना खूप वाईट वाटल्याचेदेखील तेज सप्रू यांनी सांगितले आहे.

८० व ९० च्या दशकामध्ये खलनायकाची भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करण्याच्या आठवणी सांगितल्या. तेज सप्रू यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नकारात्मक पात्र साकारले आहे. ‘द रेडिफ’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेविश्वातील अनुभव सांगितले. यावेळी काश्मीरमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना राजेश खन्ना यांनी मागून शिवी दिल्याचे तेज सप्रू यांनी सांगितले आहे.

राजेश खन्ना मला शिवीगाळ करत होते – तेज सप्रू

राजेश खन्ना यांच्याबद्दल तेज सप्रू म्हणाले, “आम्ही एका चित्रपटाचं काश्मीरमध्ये आऊटडोअर शूटिंग करत होतो. त्यावेळी अचानक माझ्या मागून कोणीतरी शिवीगाळ करत असल्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिलं तर ते काकाजी (राजेश खन्ना) होते. या घटनेबद्दल मला जास्त बोलायचं नाही, कारण त्यावेळी ते एका हिरोइनबरोबर उभे होते आणि मला शिवीगाळ करत होते. मला त्या अभिनेत्रीचं नाव सांगायचं नाही.”

पुढे ते म्हणाले, “राजेश खन्ना यांच्यामुळे हा प्रसंग झाल्यानंतर मी खूप निराश झालो होतो. शिवीगाळ केल्यामुळे मला खूप वाईट वाटले होते. त्यावेळी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक शिबू मित्रा यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला ‘सोडून दे हे’ असं म्हणत समजावण्याचा प्रयत्न केला. कारण मी इतर वेळी खूप शांत असतो, पण एकदा जर मला राग आला तर ते समोरच्यासाठी खूप वाईट ठरतं आणि शिबू मित्रा यांच्याबरोबर तर मी १० ते १५ चित्रपटांमध्ये काम केलं होतं, त्यामुळे ते माझी समजूत काढत होते.

शिवीगाळ केल्यानं खूप वाईट वाटलं होतं – तेज सप्रू

पुढे तेज सप्रू म्हणाले, “राजेश खन्ना यांच्यासाठी माझ्या मनामध्ये खूप आदर होता आणि आहे. फक्त त्यांचा नाही तर कोणत्याही ज्येष्ठ कलाकरांचा मी कायम मान राखतो. पण, एवढा आदर देऊनसुद्धा मागून अशी शिवीगाळ केल्यानं मला खूप वाईट वाटलं होतं. दुसऱ्याच दिवशी माझा आणि राजेश खन्ना यांचा एकत्रित शॉट होता. ते आल्यानंतर मी त्यांच्याशी काहीही बोललो नाही. तो असा पहिलाच दिवस होता, जेव्हा मी त्यांच्याशी काहीच बोललो नाही. त्यांच्यासमोर एक खुर्ची घेऊन पायावर पाय ठेवून मी बसून राहिलो.”

पुढे ते म्हणाले, “राजेश खन्ना आल्यानंतर त्यांनी दिग्दर्शकांकडून सीन समजून घेतला आणि आम्ही काम करू लागलो. शॉट झाल्यानंतर मी पुन्हा येऊन माझ्या खुर्चीवर बसलो, त्यावेळी राजेश खन्ना मागून आले आणि म्हणाले, ‘ये मुला…काल काय झालं ते विसरून जा…’ यावर मी त्यांना म्हणालो, ‘सर, माझी काहीही चूक नसताना तुम्ही मला शिवी दिलीत.’ यावर राजेश खन्ना म्हणाले, ‘नाही…नाही सोड आता ते, होऊन गेलं. संध्याकाळी पॅकअपनंतर माझ्याबरोबर चल.’ त्यांनी दिग्दर्शकांनाही सांगितलं की, ‘संध्याकाळी याला माझ्याबरोबर पाठवा.’ मी नाही म्हणत असताना राजेश खन्ना मला त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि रात्रभर आम्ही गप्पा मारल्या.”

तेज सप्रू यांनी ‘या’ बॉलीवूड सिनेमांमध्ये साकारल्या प्रभावी भूमिका

दरम्यान, तेज सप्रू यांनी सिनेमा आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून मनोरंजन विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘गुप्त’, ‘मोहरा’, ‘सौदागर’, ‘गुमराह’, ‘करण अर्जुन’ आणि ‘सरफरोश’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.