Rajesh Khanna Anita Advani Relationship: दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या लिव्ह-इन नात्याला लग्नाचा दर्जा मिळावा यासाठी दीर्घकाळापासून कायदेशीर लढा देणाऱ्या अभिनेत्री अनिता अडवाणीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी तिची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. ही याचिका अनावश्यक असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करणाऱ्या अनिताचे सर्व कायदेशीर दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत.

अनिता अडवाणी २०१२ मध्ये राजेश खन्ना यांचं निधन झालं, तेव्हापर्यंत त्यांच्याबरोबर राहत होती. बॉम्बे हायकोर्टाने तिची ही याचिका एप्रिल महिन्यात फेटाळली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका करत त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. “मी माझ्या सन्मानासाठी हा लढा लढतेय,” असं अनिता अडवाणीने म्हटलं होतं.

हा खटला अनावश्यक आहे

न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांच्या खंडपीठाने या याचिकेत सुनावणी करण्यासारखं काहीच नसल्याचं स्षष्ट केलं. “ही याचिका अनावश्यक आहे,” असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. जो खटला खऱ्या गरजेपोटी नाही, तर पैशाच्या बळावर किंवा वेळ घालवण्यासाठी लढला जातो, त्याला लक्झरी लिटिगेशन असं म्हटलं जातं.

यावर अनिता अडवाणीच्या वतीने तिचे वकील कोर्टात म्हणाले, “त्या नात्याला मान्यता मिळावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेतील ही मागणी फक्त सन्मानाच्या भावनेवर आधारित आहे.” दरम्यान, यापूर्वी २०१७ मध्ये मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने अनिता अडवाणीची असाच दिलासा मागणारी याचिका फेटाळली होती. जुलै २०१२ मध्ये ६९ व्या वर्षी राजेश खन्ना यांचे निधन झाल्यानंतर अडवाणीने हा खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा हाच निर्णय कायम ठेवला होता.

सर्वोच्च न्यायालयानेही गुरुवारी याचिका फेटाळली. त्यामुळे राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्याला मान्यता मिळावी, यासाठी दीर्घकाळापासून कायदेशीर लढा देणाऱ्या अनिता अडवाणीचे सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत.

राजेश खन्नांबरोबर राहत होती अनिता अडवाणी

अनिता अडवाणीने दावा केला होता की ती राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या विभक्त पत्नी डिंपल कपाडिया, मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांनी अनिताला मुंबईतील वांद्रे येथील ‘आशीर्वाद’ बंगल्यातून बाहेर काढलं होतं.

त्यानंतर २०१३ मध्ये, अनिताने डिंपल कपाडिया, त्यांच्या मुली आणि अक्षय कुमार यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. इतकंच नाही तर दरमहा पोटगी आणि वांद्रे येथे ३ बीएचके फ्लॅटही मागितला होता. २०१५ मध्ये, उच्च न्यायालयाने डिंपल कपाडिया आणि त्यांच्या कुटुंबाच्या याचिका मान्य करत अडवाणी यांची तक्रार रद्द केली होती. “अनिता व राजेश खन्ना यांचं नातं लग्नाच्या स्वरूपाचं नव्हतं, त्यामुळे त्या कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार करू शकत नाहीत,” असं ही कारवाई रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच, अनिता कधीही राजेश खन्ना यांच्या कुटुंबासोबत राहिल्या नाहीत, त्यामुळे त्या त्यांना या कायदेशीर प्रकरणात ओढू शकत नाहीत, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

अनिता अडवाणीने १९७८ मध्ये धर्मेंद्र आणि झीनत अमान यांच्या ‘शालीमार’ चित्रपटात डान्सरची छोटी भूमिका करून अभिनयात पदार्पण केलं होतं. तिने साजीश व दासी सिनेमे केले होते. तसेच तिने २०१३ मध्ये ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला होता.