राजपाल यादवला चेक बाऊन्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. अनेक आदेश देऊनही न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये २ कोटी रुपये जमा न केल्याबद्दल राजपाल यादववर ५ ऑक्टोबर रोजी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “या मग्रुरीला योग्य जागा दाखवण्याची गरज आहे,” अशा शब्दांत कोर्टाने त्याला सुनावलं.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने १५ सप्टेंबर रोजी राजपाल यादवला ५ कोटी रुपयांपैकी किमान २ कोटी रुपये जमा करण्यासाठी शेवटची संधी दिली होती. तसेच ५ ऑक्टोबरपर्यंत त्याच्या अटकेपासूनच्या तात्पुरत्या संरक्षणाची मुदत वाढवली होती. पण त्याने या आदेशाचं पालन केलं नाही.

सर्वोच्च न्यायालयाकडून राजपाल यादवची कानउघाडणी

राजपाल यादवने आदेशाचे पालन केलं नसल्याचं सोमवारी आढळल्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. पीटीआयच्या वृत्तानुसार, तक्रारदार व्यक्ती गरीब नाही असा युक्तिवाद करणाऱ्या राजपाल यादवच्या वकिलांनाही खंडपीठाने सुनावलं. न्यायमूर्ती जोयमाल्या बागची म्हणाले, “ते तुमच्यापेक्षा श्रीमंत असतीलही, पण तुम्ही त्यांना जेवढं फसवलंय ना, त्या बाबतीत ते गरीब आहेत. या मग्रुरीला योग्य जागा दाखवण्याची गरज आहे. तोंड कधी उघडावं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुझी जागा तुरुंगात आहे.”

न्यायालयाने पुढे स्पष्ट केलं की, ते राजपाल यादवचे अपील फेटाळून लावू शकले असते, पण तसं केल्याने कदाचित तक्रारदाराचे पैसे वसूल होण्यास अडचण येईल, त्यामुळे ते करत नाहीयेत.

पैसे जमा करण्यासाठी राजपाल यादवला शेवटची मुदत

राजपाल यादवच्या वकिलांनी कोर्टात ५० लाख रुपयांच्या डिमांड ड्राफ्टची प्रत दाखवली आणि बँकेत प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं. त्यावर तक्रारदाराचे वकील राजपाल यादववर संतापले. “तो अभिनेता आहे आणि तो इथेही अभिनयच करत आहे. त्याला या सर्वोच्च संस्थेच्या प्रतिष्ठेबद्दल कोणताही आदर नाही,” असं ते म्हणाले.

खंडपीठाने राजपाल यादवला मंगळवारी, ६ ऑक्टोबरपर्यंत ही रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी बुधवारी, ७ ऑक्टोबर रोजी होईल.