Supriya Pathak Pankaj Kapur Love Story: ‘गोलियों की रासलीला: रामलीला’मधील धनकोर बा असो किंवा ‘खिचडी’मधील हंसा, अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे काय मनोरंजन केले. मात्र, त्यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. वयाच्या २२ व्या वर्षी झालेले पहिले लग्न मोडल्यानंतर सुप्रिया पाठक यांची भेट अभिनेते पंकज कपूर यांच्याशी झाली. १९८६ मध्ये ‘अगला मौसम’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली ही प्रेमसंबंधित पुढे लग्नापर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे, शाहीद कपूरचे वडील पंकज कपूर यांच्याशी लग्न करण्यास सुप्रिया यांच्या आईचा, प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक यांचा प्रचंड विरोध होता.
सुप्रिया पाठक यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी लग्न केले होते, मात्र ते फार काळ टिकले नाही आणि वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. १९८६ मध्ये ‘अगला मौसम’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची भेट पंकज कपूर (शाहिद कपूरचे वडील) यांच्याशी झाली. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर १९८८ मध्ये सुप्रिया आणि पंकज विवाहबंधनात अडकले. त्यांना सना ही मुलगी आणि रुहान हा मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
ट्विंकल खन्नाच्या ‘द आयकॉन्स’ या युट्यूब चॅट शोमध्ये बोलताना सुप्रिया पाठक म्हणाल्या होत्या, “आम्ही एका चित्रपटात एकत्र काम करत होतो. तो चित्रपट कदाचित फक्त आमच्या भेटीसाठीच बनवला असावा, कारण तो कधी प्रदर्शितच झाला नाही. चित्रपट संपेपर्यंत आम्ही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली होती. चित्रीकरणानंतर आम्ही आपापल्या मार्गाने गेलो आणि नंतर मुंबईत परतलो, पण तो चित्रपट मात्र प्रदर्शित होऊच शकला नाही.”

आईचा होता कडाडून विरोध
सुप्रिया पाठक यांच्या आई, दिवंगत अभिनेत्री दिना पाठक यांच्यासह अनेकांचा पंकज कपूर यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याला विरोध होता. याबद्दल सांगताना सुप्रिया पाठक म्हणाल्या, “प्रत्येकाने मला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचेही ऐकले नाही. मी लग्नाचा पक्का निर्णय घेतला होता. अगदी मला दोन मुले झाल्यानंतरही, आई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांपर्यंत माझे मन वळवण्याचा प्रयत्न करत होती. ‘तो तुला सोडून जाईल’ किंवा ‘तुझा निर्णय चुकला आहे’ असं ती मला सतत सांगायची. मात्र, माझी बहीण रत्ना पाठक शाहने माझ्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला होता.”
सुप्रिया पाठक या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. शाहिद कपूर हा पंकज कपूर आणि नीलिमा अझीम यांचा मुलगा आहे. सुप्रिया पाठक आणि शाहिद कपूर यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. तसेच त्यांचे सून मीरा राजपूत हिच्याशीही खूप चांगले संबंध आहेत. मीरा अनेकदा सुप्रिया यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
