महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या कारवाई सुरू आहे. या कारवाईचा भाग म्हणून सोमवारी आणखी आठ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये मुंबईतील लोकप्रिय मोमोजच्या दुकानांपैकी एक असलेल्या सुरज लामा मोमोजच्या अंधेरी पश्चिम येथील मूळ शाखेचाही समावेश आहे. या दुकानाचे मालक सुरज लामा यांचा बॉलिवूडशीही खास संबंध आहे.

सुरज लामा होते शाहिद कपूर, सोनाक्षी सिन्हा यांचे ड्रायव्हर

सुरज लामा वयाच्या १४व्या वर्षी रोजगाराच्या शोधात दार्जिलिंगमधील मिरिक हे गाव सोडून मुंबईत आले. काही छोटी-मोठी कामं केल्यानंतर त्यांनी सेलिब्रिटी ड्रायव्हर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तब्बल २५ वर्षे त्यांनी ड्रायव्हर म्हणून काम केलं. यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्यासाठीही त्यांनी काम केलं आहे. याशिवाय करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्ससारख्या मोठ्या बॅनरसाठीही त्यांनी गाडी चालवली आहे.

सुरज लामा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “मी खूप मेहनतीने काम केलं आणि ज्यांच्यासोबत काम केलं, त्यांना माझ्या कुटुंबाप्रमाणेच मानलं. मात्र, काही वेळा मला समान वागणूक मिळत नव्हती. ही गोष्ट मला खटकायची.” त्यांनी एका घटनेची आठवणही सांगितली. “मी एका अभिनेत्याला शूटिंगच्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. तिथे एक मुलगा त्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी बराच वेळ वाट पाहत होता. मला त्या मुलाची मदत करावीशी वाटली. मात्र, जेव्हा मी त्याची इच्छा अभिनेत्याला सांगितली, तेव्हा त्यांनी नकार दिला. मला ते पाहून बरं वाटलं नाही,” असं त्यांनी सांगितलं.

ड्रायव्हिंग सोडून मोमोज विकण्यास सुरुवात

दरम्यान, ओला आणि उबरसारख्या अॅप-बेस्ड कॅब सेवांचा वाढता वापर हाही सुरज यांनी २०१७ मध्ये मोमोज विकण्याचा व्यवसाय सुरू करण्यामागचं एक कारण ठरलं. त्यांनी सोनाक्षी सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही स्वतःचे मोमोज खाऊ घातले होते. त्यांना सुरज यांचे मोमोज आवडले. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी आपली मोटारसायकल विकून सायकल घेतली आणि त्यावर दुकान सुरू केलं. त्यांनी पत्नी विजयता यांनाही या व्यवसायात सहभागी करून घेतलं. त्यावेळी विजयता या गायक केके यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या. त्यांनीही नोकरी सोडून सुरज यांना व्यवसायात साथ दिली.

सुरज यांनी सांगितलं, “आता मागे वळून पाहताना वाटतं की, ती खूप मोठी जोखीम होती. आम्हा दोघांना नोकरीतून प्रत्येकी सुमारे ३० हजार रुपये मिळायचे. त्यातील निम्मे पैसे घर चालवण्यासाठी खर्च व्हायचे आणि उरलेले आम्ही बचत करायचो. आमचा हा निर्णय यशस्वी ठरला, पण परिस्थिती वेगळीही होऊ शकली असती.” त्यावेळी मुंबईत उत्तर भारताच्या तुलनेत मोमोज सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे सुरज यांना सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. ते अंधेरी पश्चिम परिसरातील वेगवेगळ्या भागात सायकलवरून फिरत व्हेज आणि नॉन व्हेज मोमोज विकायचे. काही काळातच मोमोजची मागणी वाढली आणि त्यांनी वर्सोवा येथे रस्त्याच्या कडेला दुकान सुरू केलं. सुरज यांनी सांगितलं, “खरं तर, मी सध्या ज्या दुकानात व्यवसाय करतो, त्या जागेच्या मालकाला सुरुवातीला ती जागा भाड्याने देण्याची विनंती केली होती. तेव्हा त्याने मला तुम्हाला ही जागा परवडणार नाही असं सांगितलं होतं. मात्र, नंतर त्यानेच माझ्याशी संपर्क साधला.”

सुरज आणि त्यांच्या पत्नीला आधीच्या नोकरीतून प्रत्येकी ३० हजार रुपये मिळायचे. मात्र, मोमोज विकण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांची दिवसाची कमाईही लवकरच ७०० रुपयांपर्यंत पोहोचली. सुरज यांनी त्यांच्या मोमोजच्या खास रेसिपीचं गुपितही सांगितलं होतं. त्यांच्या मते, हे मोमोज त्यांना घरची आठवण करून देतात. २०१७ मध्ये ‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “माझे मोमोज अगदी माझ्या आईच्या मोमोजसारखे आहेत. मी त्यांचीच रेसिपी फॉलो करतो. यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा आर्टिफिशियल कलरिंग वापरत नाही. सुरज यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नीही उत्तम स्वयंपाक करते आणि तिच्या हातचे मोमोज अतिशय चविष्ट असतात. पुढे त्यांनी मालाड आणि कांदिवलीमध्येही आपल्या दुकानांचा विस्तार केला. मात्र, मोमोजची मोठी मागणी असलेल्या पुणे, नाशिक आणि गुजरातसारख्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय अद्याप पोहोचला नव्हता.

सुरज यांनी २०२४ मध्ये सांगितलं होतं, “दर्जेदारपणा टिकवणं महत्त्वाचं आहे. सध्या मुंबईत आमचं एक सेंट्रल किचन आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी माझी पत्नी सांभाळते. इथे २५ जणांचा स्टाफ असून, वेगवेगळ्या प्रकारचे दररोज सुमारे १६ हजार मोमोज तयार केले जातात. हे मोमोज जवळपास ९० टक्के शिजवून प्रत्येक दुकानात पाठवले जातात, मग ते आमचं स्वतःचं दुकान असो किंवा फ्रँचायझीचं.” ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत दुसऱ्या शहरातही अशाच पद्धतीने हे सगळं करता येत नाही, तोपर्यंत मी व्यवसायाचा विस्तार करणार नाही.”

दर्जेदार अन्नाबाबत सुरज लामा यांनी दिलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, सुरज लामा मोमोजचा परवाना एफडीएकडून निलंबित करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अन्न हाताळण्याची आणि साठवण्याची पद्धत, स्वच्छता, साफसफाई तसेच अन्न दूषित होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळल्याचं एफडीएने नमूद केलं आहे. अन्न सुरक्षेच्या लागू मार्गदर्शक तत्त्वांनुसार या त्रुटी गंभीर असल्याने संबंधित आस्थापनाविरोधात तातडीने कारवाई करण्यात आल्याचं समोर आलं आहे.