Suresh Oberoi struggled for son Vivek’s debut: विवेक ओबेरॉयने विविध भूमिकांतून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त मनोरंजन क्षेत्रातच नाही तर अभिनेत्याने उद्योग जगतातही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
विवेक हा ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे. विवेकने राम गोपाल वर्मा यांच्या‘कंपनी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र, सुरुवातीला काम मिळवण्यासाठी विवेक ओबेरॉयला संघर्ष करावा लागला. फक्त विवेकलाच नाही, त्याच्या वडिलांनाही त्याला काम मिळवून देण्यासाठी कष्ट घ्यावे लागले.
“तसेच विवेकचे फोटो घेऊन दारोदारी…”
सुरेश ओबेरॉय यांनी नुकतीच निधी वासंदानीच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, “मी काम मिळवताना जसा संघर्ष केला होता, तसाच संघर्ष विवेकला काम मिळवून देतानाही करावा लागला. जसे मी पूर्वी माझे फोटो घेऊन फिरायचो, तसेच विवेकचे फोटो घेऊन दारोदारी फिरायचो.”
जेव्हा विवेकसाठी काम मिळवण्यासाठी सुरेश ओबेरॉय प्रयत्न करत होते, त्यावेळी ते राम गोपाल वर्मा यांच्याबरोबर काम करत होते. त्यादरम्यान राम गोपाल वर्मा कंपनी या सिनेमासाठी हिरोच्या शोधात होते. विवेककडे त्याच्या अभिनय संस्थेतील प्रशिक्षणाचा एक व्हिडीओ होता. राम गोपाल वर्मांनी विवेकचा अभिनय पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सुरेश ओबेरॉय म्हणाले, “तो व्हिडीओ पाहण्यासाठी राम गोपाल वर्मा आमच्या घरी आले आणि त्यांना विवेकचा अभिनय आवडला”, अशा पद्धतीने विवेकला ‘कंपनी’ या सिनेमात काम मिळाल्याचे सुरेश ओबेरॉय यांनी सांगितले.
सुरेश ओबेरॉय यांनी विवेकला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले असले तरी विवेकने स्वत: काम मिळवले असल्याचे वक्तव्य केले होते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “मी जेव्हा कामाची विचारणा करण्यासाठी जायचो, तेव्हा मी माझे नाव विवेक आनंद असे सांगत असे. ऑडिशनच्या रांगेत ६ ते १० तास वाट पाहायचो. वडिलांनी निर्मिती केलेल्या सिनेमात काम करण्यासाठी नकार दिल्यानंतर मी जवळपास दोन वर्षे संघर्ष केला. मी अनेक नकार पचवले. त्यानंतर मला कंपनी या सिनेमात काम मिळाले. माझ्या गुणवत्तेच्या जोरावर मला हा सिनेमा मिळाला, याचा मला कायम अभिमान वाटत असे.”
याबरोबरच राम गोपाल वर्मांनी सुरुवातीला कंपनी सिनेमात भूमिका देण्यास आधी नकार दिला होता, असेही तो म्हणाला होता. त्यानंतर विवेकने भूमिकेनुसार स्वत:मध्ये बदल केले. त्यानंतर विवेकला कंपनी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.
दरम्यान, विवेक लवकरच रामायण सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
