Shweta Singh Kirti on brother Sushant Singh Rajput Death: बॉलीवूडचा अत्यंत गुणी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला काही वर्षे उलटून गेली असली तरी त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. आता सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने त्याच्या निधनाबद्दल एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा दावा केला आहे. श्वेताने म्हटलंय की, सुशांतचे पोस्ट मॉर्टम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या मानेवर स्टंट गन वापरल्याचे आणि त्याचा पाय मोडलेला असल्याचं सांगितलंय.
श्वेता सिंह किर्ती इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये म्हणाली, “मी नुकतीच अटलांटावरून परतले. मी तिथे ध्यानधारणा करत होते. परत आल्यावर मला तुमच्यापैकी बरेच जण भेटले. मला मिठी मारून माझ्या भावासाठी रडले. कारण तुम्हालाही वाटतंय की माझ्या भावाबरोबर चुकीचं घडलंय.”
सुशांत सिंहच्या मानेवर स्टंट गन अन् मोडलेला पाया- श्वेता सिंह
पुढे ती म्हणाली, “आम्हाला नुकतंच समजलं की ज्याने माझ्या भावाचं पोस्ट मॉर्टम केलं होतं, त्याने सांगितलं की सुशांतच्या मानेवर स्टंट गन वापरली होती. त्याचा पाय मोडला होता. तसेच त्याच्यावर खूप जास्त बळाचा वापर करण्यात आला होता. त्याच्या डोळ्यांनाही दुखापत झाली होती. हे सगळं घडलंय आणि हे चुकीचं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे व्हायला नको होतं.”
पुढे श्वेता किर्ती सिंह म्हणाली, “मी त्याची बहीण आहे आणि आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर असं काही वाईट घडतं त्याचा विचार करताना काय वाटतं, हे मी समजू शकते. तरीही अशी गोष्ट तुमच्याबरोबर घडली असेल तर तुम्ही माफ करू शकता, पण जर तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर असं काही घडलं असेल तर त्यासाठी माफ करायला खूप हिंमत लागते.”
“मला राग, द्वेष, सूडाची भावना किंवा मनात साठलेला राग या गोष्टींमध्ये अडकून राहायचं नाही. प्रेम, विश्वास, चांगुलपणा आणि देवाच्या बाजूने उभे राहणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे, असं मला वाटतं. मला वाटतं की मी लोकांसमोर एक उदाहरण ठरावं, यासाठीच हे सगळं माझ्याबरोबर घडलं. देव किंवा चांगुलपणावरील तुमचा विश्वास उडावा, असं मला वाटत नाही. जगात अन्याय आहे, वाईटपणा आहे, हे मी मान्य करते. आणि चांगल्या लोकांना कदाचित प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतात, हा त्रासच परिवर्तनाचं निमित्त ठरतात,” असं श्वेता सिंह किर्ती म्हणाली.
