Sushant Singh Rajput Screen Awards Flashback: बॉलिवूडचा गुणी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही, मात्र त्याच्या अभिनयाची आणि विचारांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सुशांत सिंह राजपूत आता हयात नसला तरी त्याने अनेक उत्तम सिनेमे केले होते. त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. २०१८ मध्ये स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्यात सुशांतला ‘रिअल स्टार अवॉर्ड’ देण्यात आला होता. मंचावर पुरस्कार स्वीकारताना ‘छिछोरे’ फेम सुशांतने आपल्या विचारांनी सर्वांना प्रभावित केलं होतं.

५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ची तयारी सुरू आहे. अशातच सुशांतचा २०१८ मधील पुरस्कार सोहळ्यातील तो व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने तेव्हा म्हटलेले शब्द आठवले की आजही त्याचे चाहते भावुक होतात. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुशांतने प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जेम्स डीनचं एक वाक्य म्हटलं होतं. “एक चांगला अभिनेता होणं सोपं नाही, पण एक चांगला माणूस होणं त्याहूनही कठीण आहे. मला माझं आयुष्य संपण्यापूर्वी हे दोन्ही बनायचं आहे,” असं सुशांत म्हणाला होता.

स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातील सुशांतचे काही मजेशीर क्षण आजही व्हायरल होत असतात. होस्ट विकी कौशल आणि आयुष्मान खुराना सुशांतबरोबर मंचावर आले आणि मग तिथले वातावरण बदलले होते. आयुष्मान म्हणालेला, “आम्ही तुला ‘केदारनाथ’ चित्रपटात एका मुलीला पाठीवर वाहून नेताना पाहिलंय. आता माझी इच्छा आहे की तू माझ्या मित्राला, म्हणजेच विकीलाही तसेच पाठीवर उचलून मंचावर एक फेरी मारावीस.” सुशांतने लगेच विकीला पाठीवर उचललं, ज्यावर आयुष्मानने त्यांना ‘विक्रम आणि वेताळ’ असं म्हटलं होतं.

Award Banner

पाहा व्हिडीओ

सुशांतला रिअल स्टार हा पुरस्कार कोणत्याही दबावाखाली नव्हे, तर सोशल मीडियावर आपली खरी आणि पारदर्शक प्रतिमा तयार केल्याबद्दल देण्यात आला होता. अभिनेत्यांमध्ये सुशांतने ही ट्रॉफी जिंकली, तर अभिनेत्रींपैकी कतरिना कैफला ‘रिअल स्टार’चा पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेतला. १४ जून २०२० रोजी ३४ वर्षीय सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतचे चाहते आजही त्याच्या आठवणींना उजाळा देत असतात.