Sushant Singh Rajput Throwback Video: बॉलीवूडचा लाडका अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. ५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या आगामी ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मुळे सुशांतचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी सुशांतला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉईस)’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुशांतने मंचावर एक आगळीवेगळी अट ठेवली होती. त्याने चक्क करण जोहरला ‘की अँड का’ चित्रपटातील ‘हाय हील्स’ गाण्यावर डान्स करायला लावला होता. आलिया भट्टसमोर घडलेला हा मजेशीर क्षण आजही चाहत्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.
‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’च्या पार्श्वभूमीवर, आपण या पुरस्कार सोहळ्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत. अशाच एका २३ व्या स्क्रीन अवॉर्ड्समधील खास प्रसंगाची चर्चा होत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दिग्दर्शक करण जोहरला ‘की अँड का’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करायला लावले होते.
सुशांतसाठी २०१६ हे वर्ष खूप खास होते, कारण याच वर्षी त्याचा ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते आणि त्याला अनेक नामांकनं व पुरस्कार मिळाले होते. २३ व्या स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सुशांतला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉईस)’ हा पुरस्कार मिळाला होता.
या श्रेणीमध्ये सुशांतबरोबर मनोज बाजपेयी (अलिगढ), नवाजुद्दीन सिद्दीकी (रमण राघव २.०) आणि शाहिद कपूर (उडता पंजाब) हे अभिनेते शर्यतीत होते. सुशांतने स्वतः पुरस्कार स्वीकारला होता. त्यानंतर धोनीच्या भूमिकेसाठी आपली निवड केल्याबद्दल आणि एवढी मोठी संधी दिल्याबद्दल त्याने दिग्दर्शक नीरज पांडे आणि निर्मात्यांचे मनापासून आभार मानले होते.
पाहा व्हिडीओ
पुरस्कार घेऊन परत जात असताना शोचे होस्ट करण जोहर आणि करण सिंह ग्रोव्हर यांनी सुशांतला थांबवलं. सुशांत एक उत्तम डान्सर आहे, असं म्हणत करणने त्याला काही स्टेप्स करून दाखवण्याची विनंती केली. सुशांत डान्स करायला आनंदाने तयार झाला, पण त्याने एक अट ठेवली की करण जोहरला देखील त्याच्याबरोबर डान्स करावा लागेल.
सुरुवातीला थोडे आढेवेढे घेतल्यानंतर करण तयार झाला आणि त्या दोघांनी ‘हाय हील्स ते नच्चे’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली आलिया भट्ट तिच्या करण जोहरला चियर करताना दिसत होती. हा क्षण त्या सोहळ्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला होता. सुशांत सिंह राजपूत आता हयात नाही. पण त्याचे जुने व्हिडीओ त्याचे चाहते शेअर करत असतात आणि आपल्या लाडक्या स्टारची आठवण काढत असतात.
