नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांची जुनी मैत्रीण आणि अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी त्यांची आठवण काढत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ३ फेब्रुवारी १९९१ रोजी अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीतील काही जुने फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून सुष्मिता यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. काळाबरोबर हरवलेले ते क्षण, निरागसता आणि त्या आठवणींशी जोडलेली माणसं यांच्याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुष्मिता मुखर्जी यांनी व्यक्त केल्या भावना

“आम्ही चौघंच होतो. वाईन, संगीत, हसणं आणि अगदी पियानोसुद्धा! आमचं एक छोटंसं जग होतं, आयुष्यात पुढे येणाऱ्या गुंतागुंतींपासून पूर्णपणे दूर असलेलं. पण नंतर आमच्यापैकी एक जण कायमचा निघून गेला. आम्हाला फक्त त्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख नाहीये, तर एकेकाळी असलेल्या त्या सुंदर क्षणांचाही विरह जाणवला. एकत्र घालवलेला वेळ, निरागसता आणि पुन्हा कधीच अनुभवता न येणारा तो काळ…” अशा शब्दांत सुष्मिता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तब्बल ३८ वर्षांपासून मैत्री असलेल्या एका जवळच्या मित्राने काही जुने फोटो पाठवले होते. ते फोटो पाहून सुष्मिता जुन्या आठवणींमध्ये रमल्या.

“त्या आठवणी धूसर झाल्या होत्या. काळाच्या ओघात अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या होत्या. पण जेव्हा मी ते फोटो पाहिले, तेव्हा काहीतरी जादू घडली. त्या फोटोंमुळे मनाच्या एका कोपऱ्यात शांतपणे जपून ठेवलेल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. अचानक ते सगळे क्षण डोळ्यांसमोर उभे राहिले. कदाचित प्रत्येक गोष्ट आठवली नाही, पण त्या दिवसांमधील प्रेम, मैत्री, एकमेकांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि त्या काळातील निरागसता मात्र पुन्हा अनुभवता आली. जे दिवस पुन्हा कधीच परत येणार नाहीत, त्यांच्या आठवणींनी मन भरून आलं. हे फोटो माझी मैत्रीण दीप्ती नवल हिच्या ३ फेब्रुवारी १९९१ रोजी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहेत,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

“आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट हळूहळू समजते, ती म्हणजे आयुष्य कधीच एकसारखं राहत नाही. ते अनपेक्षित वळणं घेत सतत पुढे जात असतं. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही निघून जातात, आठवणी धूसर होतात आणि अशातच कधीतरी एखादा जुना फोटो पुन्हा सगळ्या आठवणी ताज्या करतो. या सगळ्यात आपण मात्र पुढे जात राहतो. एकमेकांची साथ देत, आयुष्यातील अनोळखी वळणांचा स्वीकार करत आणि आयुष्य नावाच्या या सुंदर, पण तितक्याच हळव्या प्रवासातील प्रत्येक क्षण जपून ठेवतो,” असं सुष्मिता यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी दीप्ती नवल यांनीदेखील एका चित्रपटातील फोटो शेअर करत नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. गौतम घोष यांच्या ‘यात्रा’ चित्रपटातील नाना आणि त्यांच्यातील एका संघर्षाच्या प्रसंगातील फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ८ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने नाना पाटेकर यांचं गोव्यातील राहत्या घरी निधन झालं. पुण्यातील डोणजे फार्महाऊसवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.