Sushmita Sen Adoption Controversy : इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतरही इंडस्ट्रीत काम करणं सुरू ठेवलं आणि त्यांच्या मुलांचं संगोपणही केलं, पण खरं तर अभिनेत्रींसाठी यशाच्या शिखरावर असताना असा निर्णय घेणं तितकं सोपं नसतं. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्यचदा काम जाण्याची भीतीही असते. असंच काहीसं घडलेलं बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनबरोबर.
सुश्मिता सेन हिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. तिच्या दोन्ही लेकी आता मोठ्या झाल्या आहेत. पण, जेव्हा तिने आई होण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनीच तिच्या या निर्णयचा स्वीकार केला नाही. खूप लाहन वयात हा निर्णय घेतला त्यामुळे तुला साईड रोलही मिळणार नाही असंही तिला ऐकावं लागलं. पण, आजही अभिनेत्री इंडस्ट्रीत सक्रीय असून तिने अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. सुश्मिताबरोबर नेमकं काय घडलं होतं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
सुश्मिता सेन हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या चार वर्षांत मोठी मुलगी रेनी सेन हिला दत्तक घेतलं होतं. महेश भट्ट यांच्या १९९६ मधील ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या काळात डेव्हिड धवन यांच्या ‘बिवी नंबर १’ या हिट चित्रपटात तिने सलमान खानबरोबर काम केलं होतं. वयाच्या २४व्या वर्षी सुश्मिताने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एका मुलाखतीत सुश्मिता सांगितलं की, तिने मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या मॅनेजरने तिच्याबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. कारण, त्याला वाटत होतं की तिला करिअरबद्दल गांभीर्य नाहीये.
सुश्मिताला मॅनेजर काय म्हणालेला?
सुश्मिता सेनने सांगितलं की, मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिचा मॅनेजर म्हणाला, “तू तुझ्या करिअरबाबत गंभीर नाहीस. २४ वर्षांची आई असलेल्या अभिनेत्रीचं प्रतिनिधित्व मी करू शकत नाही. तुला कॅरेक्टर रोलसुद्धा मिळणार नाहीत.” याबद्दल सुश्मिता पुढे म्हणाली, “तो निघून गेला पण, मला त्याच्या जाण्याने वाईट वाटलं नाही आणि विश्वास बसणार नाही, पण आई झाल्यानंतरच मी माझे सर्वात मोठे हिट चित्रपट दिले.”
यानंतर सुश्मिता सेनला जाणवलं की, तिचा मॅनेजर पूर्णपणे चुकीचा नव्हता. कारण मुलगी दत्तक घेतल्यानंतर तिला इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात विरोध आणि टीकेला सामोरे जावं लागलं. सुश्मिता म्हणाली, “लोक म्हणायचे, ही काय करतेय? ती आधीच करिअरबाबत फार गंभीर नाही.” तिने सांगितलं की आई झाल्यानंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच तिने अभिनयाचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नसल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली होती.
