Sushmita Sen Unmarried Reason: बॉलीवूडची सर्वात ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री सुश्मिता सेन आपल्या दमदार अभिनयासोबतच बिंधास्त आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. व्यावसायिक आयुष्याबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्याबद्दलही नेहमीच खूप मोकळेपणाने बोलते. सुश्मिता सध्या ५० वर्षांची आहे, पण तिने अजून लग्न केलेलं नाही. ती सिंगल असून तिच्या रेने आणि अलिसा या दोन मुलींचा एकटीने सांभाळ करतेय. सुश्मिताने लग्न का केलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आता तिने लग्न न करण्यामागचे खरे कारण सांगून सर्वांनाच चकित केले आहे. तिच्या या वक्तव्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुश्मिताने ‘हेल्थ शॉट्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अविवाहित राहण्याचं कारण स्पष्ट केलं होतं. “माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज म्हणजे माझं स्वातंत्र्य आहे. मी एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती आहे. मी जे काही करते ते मनापासून करते, कोणत्याही अपेक्षेपोटी करत नाही. मी अजूनही सिंगल आहे कारण मला अजूनपर्यंत अशी कोणतीही व्यक्ती भेटलेली नाही, जिच्याबरोबर मला माझे संपूर्ण आयुष्य घालवावेसे वाटेल. माझ्या आयुष्यात प्रेमाची अजिबात कमतरता नाही. अनेकांना वाटतं की संवेदनशीलता लग्नानंतर येते, पण माझ्याकडे दोन गोड मुलींच्या रूपाने त्या आधीपासूनच आहेत. मी एकटीनेच त्यांचा सांभाळ केला आहे,” असं सुश्मिता सेन म्हणाली होती.
मला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचंय – सुश्मिता सेन
“मला माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. मला फक्त एवढंच वाटतं की या जगात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. मला माझ्या अटींवर आयुष्य जगायचं होतं आणि मी तेच करतेय. मी लोकांचे विचार ऐकले, पण स्वतःला नेहमी हाच प्रश्न विचारला की मला नक्की काय हवं आहे. मी सगळ्यांचं ऐकतं, पण करते मात्र तेच जे माझ्या मनाला पटतं,” असं सुश्मिता सेनने म्हटलं होतं.
सुश्मिता सेनला डेट करण्याबद्दल ललित मोदी म्हणाले…
सुश्मिता सेनने ललित मोदी यांना डेट केले होते. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’शी बोलताना ललित मोदी म्हणाले, “सुश्मिता एक अत्यंत सुंदर, यशस्वी आणि स्वतःच्या हिमतीवर उभी असलेली खंबीर महिला आहे. खरं तर, माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल, जिच्याकडे सुष्मितापेक्षा जास्त हिरे असतील. तिने हे सर्व काही स्वतः कमावलंय, तिचे स्वतःचे हिऱ्यांचे स्टोअर्सही होते. तिला लोक गोल्ड डिगर म्हणत होते, ते अत्यंत चुकीचं होतं.”
दरम्यान, सुश्मिता सेनने १९९४ साली अवघ्या १८ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. यानंतर तिने ‘मै हूं ना’ आणि ‘आंखें’ यांसारख्या अनेक यशस्वी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. तिने लग्न न करता रेने आणि अलीशा या दोन मुलींना दत्तक घेतले असून, ती त्यांचा सांभाळ करतेय.
